आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी एटीएम किंवा बँकेत वारंवार जाण्याची गरज नाही. तुमच्या घरी रोख रक्कम आपोआप येईल. आश्चर्यचकित होऊ नका, अशी एक सेवा आहे ज्याच्या मदतीने बँकेत अथवा एटीएम केंद्रात न जाताही तुमच्या खात्यातील पैसे घरबसल्या मिळू शकतात. ही किमया शक्य झाली आहे आधार एटीएममुळे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ही सुविधा दिली जात आहे.
आधार एटीएम सेवा म्हणजे आधार सक्षम पेमेंट सेवा. या आधार एटीएम सेवेच्या मदतीने खातेदाराचे बायोमेट्रिक्स वापरून बँकिंग सेवा दिली जाते. या पेमेंट सेवेचा अर्थ घरबसल्या पैसे काढण्याची सुविधा आहे. ती वापरण्यासाठी आपल्याला प्रथम बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावे लागेल.
आधारशी लिंक केलेल्या बँक खात्याच्या ग्राहकाच्या बायोमेट्रिक तपशिलाद्वारे त्यांना त्यांच्या घरी रोख पैसे काढणे, शिल्लक चौकशी, रोख पैसे काढणे, मिनी स्टेटमेंट इत्यादी मूलभूत बँकिंग सेवांची सुविधा मिळते. इतकेच नाही, तर या सेवेच्या मदतीने तुम्ही आधार टू आधार पैसे ट्रान्स्फर करता येतात. तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाशी अनेक बँक खाती लिंक केली असतील, तर व्यवहाराच्या वेळी ज्या खात्यामधून पैसे काढायचे आहेत ते बँक खाते निवडावे लागेल. या सेवेद्वारे तुम्ही 10,000 रुपयांपर्यंतचे रोख व्यवहार करू शकता.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे तुमच्या घरी रोख रक्कम पोहोचवण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही; परंतु बँक तुमच्याकडून डोअर स्टेप सेवेसाठी शुल्क आकारेल. ही सेवा वापरण्यासाठी आयपीपीबीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
तेथे डोअर स्टेप पर्याय निवडा. तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पत्ता, पिनकोड यासारखे तपशील भरा. तुमचे खाते असलेल्या बँकेचे नाव भरा. 'आय अॅग्री'वर क्लिक करा आणि सबमिट करा. काही वेळाने पोस्टमन तुमच्या घरी रोख रक्कम घेऊन येईल.