Jai Bhim – आपल्या समोर अन्याय होत असताना आपण अनेकदा पाहिलंय. आपल्या अवतीभोवतीही अनेकांना अन्यायाला सामोरे जावं लागतं. अन्याय वेगवेगळ्या पातळींवर होत असतो. मग आपण काय करतो. निमूटपणे सहन करतो किंवा बघून गप्प बसतो. पण, अन्यायाला वाचा फोडणारं कुणीतरी हवं ना! कधी ते धर्मावरून होत असतं तर कधी जातीवरून. कधी लाचार, गरिबांवर अन्यायाचा मारा होत असतो. जय भीम हा मूळ तमिळ भाषेतील चित्रपट आहे. कधीही न पाहिलेल्या अत्याचाराचे दृश्य जय भीम चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. घालून दिलेल्या व्यवस्थेच्या भिंती आणि त्यावर राज्य करणारी एकमेकांशी लागेबंद असणारी काही माणसं किती क्रूरपणे वागतात. हे जय भीम! चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. (Jai Bhim)
स्वत: केलेला गुन्हा लपवण्यासाठी संरक्षण करणारेचं पोलिसचं एका आदिवासी माणसावर क्रूरपणे अत्याचार करतात. जबरदस्तीने त्याला पोलिस स्टेशनमध्ये उचलून नेतात. त्याला इतकं मारतात की, त्यात त्याचा मृत्यू होतो. तुम्ही हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हालाही चिड येईल. तुमचं रक्त खवळेल. तुम्हीही म्हणाल, चित्रपटातील पोलिस इतके राक्षसीवृत्तीचे कसे असू शकतात? (Jai Bhim)
हा आदिवासी म्हणजेच राजकन्नू होय. राजकन्नूची पत्नी तिच्या पतीला वाचवण्यासाठी पुढे सरसावते. ती एका वकिलाकडे जाते, त्या वकिलाचं नाव आहे-चंद्रू. चंद्रू एक उत्तम वकिल आणि अन्यायाविरोधात लढणारा आहे. या वकिलाची भूमिका साकारलीय-साऊथ सुपरस्टार सूर्या याने. मानवाधिकार प्रकरण तो हाताळत असतो. तो या आदिवासीची केस लढताना अनेक घृणास्पद सत्य उघडकीस येतात. चंद्रूची अन्यायाविरोधातील लढाई ही केवळ अत्याचाराची कहाणी नाहीय. तर व्यवस्थेतील भ्रष्टपणा, आर्थिक विषमता, जाती-पाती आणि खालच्या वर्गाला दाखवलेल्या हीनपणाची कहाणी होय.
अनेक शतकं आपण जाती-धर्माची रचना मांडत त्याखाली जगत आलोय. आजही तेचं घडतंय. अनेक ठिकाणी पदोपदी जात-धर्म काढली जाते. उच्च-नीच असा भेदभाव केला जातो. आतादेखील खालच्या वर्गातील माणसांची वस्ती वेशीबाहेर वा गावाबाहेर असते. आजदेखील शिवाशिवसारखे प्रकार घडतात. आपण, अनेकवर्षे हे पाहत आलोय आणि सहनही करत आलोय. जय भीमचा विषय असाचं काहीसा आहे. यामध्ये पोलिसांकडून झालेला अत्याचार म्हणजे क्रूरतेच्या पलिकडचा हिंसाचार होय.
राजकन्नू हा आदिवासी असून तो साप, उंदिर पकडण्याचे काम करतो. एकदा गावातील एक उच्च व्य़क्तीचा नोकर त्याला बोलवायला येतो. त्याला गाडीवरून घेऊन जात असताना राजकन्नू आधारासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, तेव्हा तो नोकर मागे वळून रागाने त्याच्याकडे पाहतो. तेव्हा त्याच्या डोळ्यातील भावना राजकन्नू जाणतो आणि तो हात पटकन मागे घेतो.
चंद्रू म्हणजेच सूर्या आणि आय़जी पेरुमल स्वामीची भूमिका साऊथ स्टार प्रकाश राज यांनी साकारलीय. चंद्रू हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तामिळनाडूतील समाजसुधारक पेरियार यांच्या विचारांनी प्रेरीत आहे.
चित्रपटामधील एका दृश्यात तो एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दाखवण्यात आलंय. तेथे लहान मुले महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या वेषात उभे असतात. चंद्रूला या महापुरुषांमध्ये मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेचं दिसतं नाहीत. तेव्हा चंद्रू मुख्याध्यापकांना विचारतो- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठेचं दिसतं नाहीयेत. अगदी तळागाळातील लोकांचा उध्दार करणारे, त्यांना त्यांचे हक्क-अधिकार मिळवून देणाऱ्या या महापुरुषांविषयी शाळेतील शिक्षकांमध्ये अनास्था का? हे या दृश्यावरून प्रतीत होते. या चित्रपटातील अभिनेत्रीने राजकन्नूच्या पत्नीची उत्तम साकारलीय. ती अभिनेत्री Lijomal Jose होय. या अभिनेत्रीने चित्रपटात सेंगानीची व्यक्तीरेखा साकारलीय.
जेव्हा पोलिस राजकन्नूला उचलून पोलिस ठाण्यात नेतात आणि तुरंगात डांबतात. त्यावेळी चित्रपटाचे कथानक सेंगानीकडे वळते. पुढचा बराच चित्रपट सेंगानीवर भार टाकतो. दोन साऊथ स्टार प्रकाश राज आणि सूर्य चित्रपटामध्ये असतानाही सेंगानी आपली अभिनयाची छाप सोडायला यशस्वी ठरलीय. हा चित्रपट पाहिल्यानंतर कनिष्ठ वर्गाचे दुःख तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे आणि शेवटी सामाजिक संदेश देण्यासाठी 'जय भीम' यशस्वी ठरतो.