उरलो वाढदिवसापुरता… | पुढारी

उरलो वाढदिवसापुरता...

ते अजून मला विसरले नाहीत. तुम्हालाच काय मलाही ते कालपरवापर्यंत पटत नव्हते. (Advani) वाढदिवसाला ते आले, त्यांनी केक कापला. माझे अभिनंदन केले. माझा माझ्या डोळ्यांवरच काय स्वतःवरही विश्‍वास बसत नव्हता. बघता बघता आयुष्याची 94 पाने गळून गेली. अजून किती राहिलीत माहीत नाही. एखाद्या चित्रपटाप्रमाणे मोठा काळाचा पट आमच्या नजरेसमोरून दिवसभर सरकत राहिला.

संघ, जनसंघातले ते तरुणपणाचे दिवस आठवत राहिले. आणीबाणीनंतर जनता पक्षात आम्ही गेलो. कच संजीवनी विद्या हस्तगत करतो तसे आम्ही सत्तेची विद्या हस्तगत केली. आम्ही त्या कळपात कायमचे राहणे शक्यच नव्हते. वेळ येताच आम्ही आमचा भारतीय जनता पक्ष स्थापन केला. तो संघर्षाचा काळ विसरून कसे चालेल. आम्हीच त्या रथयात्रेचे नेतृत्व केले होते. त्यामुळेच तर देशात भाजपला अनुकूल वातावरण तयार झाले. कधी काळी संसदेत पक्षाचा केवळ एक सदस्य होता. (Advani)

त्याचे शंभर झाले. नंतर शंभराचे दोनशे झाले. पक्षाला आघाडीचे सरकार का असेना स्थापन करता आले. सहमतीच्या राजकारणात आमच्याच थोरल्या बंधूंना पंतप्रधानपद मिळाले; पण सरकारचा खरा चेहरा आम्हीच होतो. पाकिस्तानात जीनांची स्तुती केली म्हणून पदत्याग करण्याचे धाडस आम्ही दाखविले. इंडिया शायनिंगच्या मोहिमेला यश मिळाले असते, तर कदाचित आम्हीच पंतप्रधान झालो असतो.

आमच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या; पण पक्षाला आम्ही सत्ता मिळवून देऊ शकलो नाही. काळाची पावले ओळखून पक्षात बदल झाले. आम्हाला दुय्यम भूमिका घ्यावी लागली. शेवटी यश महत्त्वाचे असतेच. गुजरातचे छोटे सरदार मोठे झाले. माझ्या सोबतचे काही सहकारी त्यांचे जवळचे झाले. राजकारणात हे असे चालत असतेच. आज पक्ष कार्पोरेट बनला आहे. आमच्यासारख्या नेत्यांची जागा कंपनीच्या सीईओसारख्या वाटणार्‍या लोकांनी घेतली आहे. ते आज ज्या पदावर आहेत, ते आमच्यामुळेच. (Advani)

अनेक वर्षांपासून वाटायचे की, तेच काय सगळेच मला हळूहळू विसरून गेले आहेत की काय; पण ते वाढदिवसाला आले आणि मला खूप बरं वाटलं. ते विसरलेले नाहीत. अन्यथा वाढदिवसाला येण्याचे औचित्य त्यांनी दाखविले नसते. अनेक दिवस मी नित्यनियमाने स्वतःला आरशात पाहणे टाळत होतो. आज सकाळीच उठल्यावर माझा चेहरा पाहिला. तो तेजस्वी वाटला. गालावर गुलाबी तकाकी आल्यासारखे वाटले.

माणसाच्या मनातील आशा चिवट असते. खरे म्हणजे, त्यांनी पूवीर्र्च देशाच्या सर्वोच्च पदासाठी विचार करायला हवा होता; पण नाही केला. मनात म्हटले, आपले दिवस राहिले नाहीत. आपण केवळ वाढदिवसापुरते उरलो आहोत, असे वाटायचे. आता तसे वाटत नाही. त्यांच्या मनात आदरभाव नव्हे, तर प्रेमही आहे, असे वाटते. माझे दिवस बदलतील, असे मी समजावे का, या प्रश्‍नाचे होकारार्थी किंवा नकारार्थी असे निश्‍चित उत्तर मात्र देता येत नाही.

– झटका

Back to top button