पुढारी ऑनलाईन डेस्क : मेटा, ट्विटर, अॅमेझॉन सारख्या दिग्गज कंपन्या नोकरकपात करत असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, सध्याच्या आर्थिक मंदीच्या परिस्थितीत जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover ) या कंपनीने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. जग्वार लँड रोव्हरने ब्रिटन, आयर्लंड, अमेरिका, भारत, चीन आणि हंगेरीमध्ये ८०० हून अधिक नवीन डिजिटल आणि अभियांत्रिकी पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी भरती मोहिमेची घोषणा केली आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.
भारताच्या टाटा मोटर्सच्या मालकीची असलेली जग्वार लँड रोव्हर कंपनी टेक मनुष्यबळासाठी सेल्फ-ड्रायव्हिंग, इलेक्ट्रिफिकेशन, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सची ८०० पदे भरणार आहे. जग्वार लँड रोव्हरची मालकी टाटा मोटर्सकडे आहे. ही कंपनी आता मेटा आणि ट्विटर सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी कामावरून काढून टाकलेल्या कर्मचार्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे.
Jaguar Land Rover चे मुख्य माहिती अधिकारी अँथनी बॅटल यांनी म्हटले आहे, "आम्ही आमचा डेटा आणि डिजिटल कौशल्यांचा पाया अधिक बळकट करत आहोत. जेणेकरुन आम्ही २०२५ पर्यंत इलेक्ट्रिक-फर्स्ट बिझनेस बनवू तसेच २०३९ पर्यंत झिरो कार्बनचे ध्येय गाठू. आमचा डिजिटल बदलाचा प्रवास चांगला सुरू आहे. पण उच्च कुशल डिजिटल कामगारांची भरती करणे पुढची एक महत्त्वाची पायरी आहे. डिजिटल कौशल्य असलेल्या प्रतिभावान व्यक्तींना संधी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे."
गेल्या वर्षी JLR ने इलेक्ट्रिफिकेशन धोरण जाहीर केले. यामुळे २०२४ पर्यंत सर्व जग्वार कार पूर्णपणे इलेक्ट्रिक होणार आहेत आणि लँड रोव्हरसह त्याच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक पर्याय ऑफर केला जाणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलली आहेत.
फेसबुकची मालकी असलेल्या मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तर ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने १० हजार नोकरकपात केली आहे. तर ट्विटरचे मालकी मिळवलेले एलन मस्क यांनी ५० टक्के कर्मचार्यांना काढून टाकले आहे. अशा परिस्थितीत टाटाची जग्वार लँड रोव्हर कंपनी नोकरभरतीसाठी पुढे आली आहे. (Jaguar Land Rover)
हे ही वाचा :