Amazon कडून पुढील वर्षीही नोकरकपात कायम राहणार, १० हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड? | पुढारी

Amazon कडून पुढील वर्षीही नोकरकपात कायम राहणार, १० हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनमधील ले ऑफ म्हणजेच नोकरकपात पुढील वर्षीही कायम राहणार आहे. या आठवड्यापासून Amazon ने मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु केली आहे. ही नोकरकपात पुढील वर्षीही रायम राहील, असे कंपनीचे सीईओ अँडी जस्सी (CEO Andy Jassy) यांनी स्पष्ट केले आहे. ॲमेझॉनकडून सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.

अँडी जस्सी यांनी कर्मचाऱ्यांना एक लेखी मेमो जारी केला आहे. त्यातून कंपनीने बुधवारी त्यांच्या डिव्हाईस आणि बुक्स विभागातील कर्मचार्‍यांना नोकरकपातीबद्दल माहिती दिली आहे. कंपनीने काही इतर कर्मचार्‍यांना आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात स्वच्छेने नोकरी सोडण्याची ऑफर दिली आहे.

“मी कंपनीतील पदावर सुमारे दीड वर्षे काम करत आहे. पण नोकरकपातीचा आम्ही घेतलेला हा सर्वात कठीण निर्णय आहे. विशेषतः कोरोनामधील काळ आमच्यासाठी अधिक कठीण होता.” असे जस्सी यांनी मेमोमध्ये म्हटले आहे.

Amazon ने गेल्या काही महिन्यांत त्यांच्या व्यवसायाच्या विविध क्षेत्रांमधील खर्च कमी केला आहे. गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात झालेली कर्मचाऱ्यांची भरती आणि सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता या वर्षी आर्थिक ताळमेळ साधणे अधिक कठीण बनल्याचे जस्सी यांनी नमूद केले आहे.

इतर टेक कंपन्यांनीदेखील आर्थिक मंदीच्या चिंतेने कर्मचारी कपात सुरु केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या मेटाने गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते ११ हजार लोकांना काढून टाकेल. ही कर्मचारी कपात त्यांच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे १३ टक्के आहे. ट्विटरचे नवीन सीईओ एलन मस्क यांनीही या महिन्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या निम्यावर आणली आहे.

नुकतीच ॲमेझॉनने कॅलिफोर्नियातील अधिकार्यांना सूचित केले की ते विविध विभागांतील सुमारे २६० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतील. कंपनीकडून वार्षिक आढावा प्रक्रिया सुरु असून आणखी काही विभागांमध्ये नोकरकपात केली जाईल, जी पुढील वर्षी सुरू राहील असे जस्सी यांनी नमूद केले आहे.

ॲमेझॉनने कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदल्याचे पॅकेज देत आहे. जगभरात ॲमेझॉन कंपनीत १५ लाख लोक काम करतात.

हे ही वाचा :

Back to top button