Tech Layoffs | नोव्हेंबरमध्ये ‘नो जॉब्स’; ट्विटर, फेसबुक, ॲमेझॉननं १५ दिवसांत ३८ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ! | पुढारी

Tech Layoffs | नोव्हेंबरमध्ये 'नो जॉब्स'; ट्विटर, फेसबुक, ॲमेझॉननं १५ दिवसांत ३८ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक मंदीच्या धास्तीने जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसांत (Tech Layoffs) सुमारे ३८ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. layoffs.fyi या डेटा एग्रीगेटरकडून मिळालेल्या डेटाच्या आधारावर बिझनेस टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. या डेटानुसार १६ नोव्हेंबरपर्यंत जगभरातील ३७ हजार ८६६ कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी नारळ दिला आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकची मालकी असलेली मूळ कंपनी मेटामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात करण्यात आली आहे. मेटाने ९ नोव्हेंबर रोजी ११ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले. जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने १६ नोव्हेंबर रोजी १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने ४ नोव्हेंबर रोजी ३ हजार ७०० लोकांना कामावरून काढून टाकले.

या मास टर्मिनेशनमुळे टेक आणि टेक-संलग्न कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. टेक कंपन्यांना आर्थिक ताळमेळ साधताना अडचणी येत असल्याचे या नोकरकपातीमुळे दिसून येत असल्याचे प्रमुख गुंतवणूकदार आणि मार्केट समालोचकांचे म्हणणे आहे.
ॲमेझॉनमधील ले ऑफ म्हणजेच नोकरकपात पुढील वर्षीही कायम राहणार आहे. या आठवड्यापासून Amazon ने मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु केली आहे. ही नोकरकपात पुढील वर्षीही कायम राहील, असे कंपनीचे सीईओ अँडी जस्सी (CEO Andy Jassy) यांनी स्पष्ट केले आहे. ॲमेझॉनकडून सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे.

इतर टेक कंपन्यांनीदेखील आर्थिक मंदीच्या चिंतेने कर्मचारी कपात सुरु केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या मेटाने गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते ११ हजार लोकांना काढून टाकेल. ही कर्मचारी कपात त्यांच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे १३ टक्के आहे. ट्विटरचे नवीन सीईओ एलन मस्क यांनीही या महिन्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या निम्यावर आणली आहे. (Tech Layoffs)

हे ही वाचा :

Back to top button