पुढारी ऑनलाईन : हमास आणि इस्राईलमध्ये युद्ध पेटले आहे. हमास दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे सुरू केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आतापर्यंत इस्राईल आणि गाझामध्ये सुमारे १,१०० लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. यात इस्राईलमधील मृतांचा आकडा ७०० हून अधिक आहे. तर गाझामध्ये ४०० लोक ठार झाले आहेत. इस्राईल अजूनही त्यांच्या स्वतःच्या भूभागावर ७ ते ८ ठिकाणी हमास दहशतवाद्यांशी लढा देत आहे, असे लष्कराचे म्हणणे आहे. इस्राईल संरक्षण दलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गाझामधील सुमारे ५०० हून अधिक टार्गेट्सवर हल्ला केला आहे. (Israel Hamas war news)
दरम्यान, थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की हमासने शनिवारी सकाळी हल्ले सुरू केल्यापासून त्यांचे १२ थाई नागरिक ठार झाले आहेत. तर ११ जणांना ओलिस ठेवले असून ८ जण जखमी झाले आहेत. (Israel Hamas War Updates)
संबंधित बातम्या
बीबीसीच्या वृत्तानुसार, गाझा पट्टीत ५०० हून अधिक हमास आणि इस्लामिक जिहाद सेंटरवर एका रात्रीत हल्ला केला, असे इस्रायली हवाई दलाने (IAF) म्हटले आहे. गाझा पट्टीत लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि तोफांनी शत्रूंवर मारा केला. इस्रायलीने हमासच्या ७ कमांड सेंटर आणि इस्लामिक जिहाद कमांड सेंटरला लक्ष्य केल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. दरम्यान, पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायली हवाई हल्ले सुरू झाल्यापासून गाझामध्ये ४१३ लोक मारले गेले आहेत.
मोठ्या संख्येने लोक गंभीर जखमी झाल्यामुळे मृतांची संख्या वाढतच जाईल, असे इस्राईल संरक्षण दलाने म्हटले आहे. दरम्यान, हमासने केलेल्या हल्ल्यामुळे एका संगीत महोत्सवाच्या ठिकाणी २६० मृतदेह सापडले आहेत. या संगीत महोत्सवात सुमारे ३ हजार लोक उपस्थित होते. हा उत्सव गाझा पट्टीपासून अधिक दूर नसलेल्या किबूट्झ रेइम जवळ नेगेव वाळवंटात आयोजित करण्यात आला होता. (Israel Hamas war news)
इस्राईलमधील मृतांचा आकडा वाढतच जाईल. कारण मोठ्या संख्येने लोक गंभीर जखमी झाले आहेत, असे इस्राईली लष्कराकडून सांगण्यात आले आहे. युद्ध सुरु झाल्याच्या ३६ तासांनंतरही गाझामधून दक्षिण इस्राईलमध्ये रॉकेट डागले जात आहेत. इस्राईलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे गाझामधील १ लाख २३ हजार पॅलेस्टिनी नागरिक विस्थापित झाले आहेत. तर सुमारे ७४ हजार शाळांमध्ये ते आश्रय घेत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. (Israel Hamas War Updates)
इतर अनेक देशांनी असे म्हटले आहे की त्यांच्या नागरिकांना हमासने मारले आहे. तसेच काहींना ओलीस ठेवले आहे. दरम्यान, हमासच्या हल्लाला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने त्यांची विमानवाहू युद्धनौका इस्राईलच्या जवळ हलवली आहे आणि ते अधिक शस्त्रसाठा पाठवणार आहेत. पुढील ४८ तासांत इस्राईल गाझामधील भूभागावर आक्रमण करेल, अशी शक्यता अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :