पुढारी ऑनलाईन डेस्क : इर्शाळवाडी येथे अद्यापही बचावकार्य सुरु आहे. आपत्तीग्रस्त लोकांसाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, बिस्किटे तसेच प्रथमोपचार साहित्य दिले जात आहे. त्याशिवाय, तात्पुरते निवारे उभे केले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला रायगड जिल्ह्यातील उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच मदतकार्यासाठी तैनात मनुष्यबळासाठी अन्नाची पाकिटे, चादरी-ब्लॅंकेटस, तात्पुरते निवारे, कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, बिस्किटे तसेच प्रथमोपचार साहित्य आदी मदत साहित्याचा ओघ सुरु झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे – २० बाय १० आकाराचे ४, ४० बाय १० आकाराचे २ आणि इतर दोन असे ६ कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी आणि जेएसडब्ल्यू समूहाकडून घटनास्थळावरील बेसकॅम्पकडे रवाना झाले आहेत. चौक, खालापूर येथे तात्पुरती निवाराव्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तीन हजार अन्नाची पाकिटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. घटनास्थळ उंचीवर असल्याने यंत्रसामुग्री पोहोचत नसल्याने मातीचे ढिगारे दूर करण्यासाठी पनवेल येथून ८० अनुभवी कारागीरांचे पथक अवजारांसह घटनास्थळी पोहोचले आहे.
आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे-दुर्घटनाग्रस्त भागात विद्युत पुरवठा, तात्पुरती निवारा व्यवस्था, अन्न व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, उपलब्ध होणारी साहित्य सामुग्री, जखमींवर उपचाराची सुविधा देण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अचानक काही मदत लागल्यास 'फ्लड लाईटस' लावण्यात आले आहेत.
महसूल, जिल्हा परिषद व पोलिस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरी संरक्षण दल मुंबई येथून दोन पथके, एनडीआरएफची चार पथके १५० मनुष्यबळासह घटनास्थळी असून इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, युवा मंडळे, ट्रेकर्स ग्रुपचे प्रतिनिधी असे सुमारे ७०० जण मदत कार्यात सहभागी झाले आहेत.
आज भर पावसात मदत कार्य सुरु असून काल सर्वाधिक १९८ मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात झाली आहे. पावसामुळे दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.
विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.