IPL 2022 Fast Bowlers : यंदाच्‍या आयपीएलने भारताला दिली वेगवान गोलंदाजांची ‘फौज’! ‘यांना’ मिळणार क्रिकेट संघात स्‍थान!

IPL 2022 Fast Bowlers : यंदाच्‍या आयपीएलने भारताला दिली वेगवान गोलंदाजांची ‘फौज’! ‘यांना’ मिळणार क्रिकेट संघात स्‍थान!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतातील आजच्‍या घडीचे वेगवान गोलंदाज म्‍हटलं की, मोहम्‍मद शमी, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव यांची नावे समोर येतात. मागील काही वर्ष याच गोलंदाजांवर भारतीय क्रिकेट संघाची मदार राहिली आहे. मात्र यंदाच्‍या आयपीएलने भारतीय क्रिकेटला वेगवान गोलंदाजांची फौजच दिली आहे. जाणून घेवूया यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये दमदार कामगिरी करणारे वेगवान भारतीय गोलंदाज.

IPL 2022 Fast Bowlers : जम्‍मू एक्‍सप्रेस उमरानने गाजवले आयपीएल

यंदाच्‍या आयपीएलमधील भारतासाठी सर्वात आश्‍वासक कामगिरी जम्‍मू-काश्‍मीरमधील वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने केले. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्‍याने १४ सामन्‍यांमध्‍ये २२ बळी घेतले. उमरानने ज्‍या तडफेने गोलंदाजी केली याला तोडच नाही. पंजाब किंग्‍जचा कर्णधार मयंक अग्रवाल याने फलंदाजीला आल्‍यावर उमरानला टोमणा मारला. यावेळी उमरान याने त्‍याला शब्‍दाने उत्तर देण्‍याऐवजी वेगवान गोलंदाजीने उत्तर दिले. विशेष म्‍हणजे, सरावावेळी जॉनी बेरस्‍टो या दिग्‍गज फलंदाजालाही त्‍याला गोलंदाजीचा वेग कमी  ठेव , अशी विनंती करावी लागली. यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये त्‍याने ताशी १५७ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करत जगभरातील फलंदाजांना आपली दखल घेणे भाग पाडले आहे. आयपीएलमध्‍ये दमदार कामगिरीमुळे त्‍याची दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्‍या टी-२० मालिकेत भारतीय संघात निवड झाली आहे. आता तो दक्षिण आफ्रिकेत कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.

डावखुरा मोहसीन ठरणार जहीर आणि इरफानचा 'वारसदार'

डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान हा मागील तीन सीजन मुंबई इंडियन्‍स संघात होता. मात्र त्‍याला संधीच देण्‍यात आली नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर त्‍याला लखनौ संघात संधी मिळाली; पण पहिल्‍याच सामन्‍यात त्‍याची कामगिरी खराब झाली. त्‍यामुळे त्‍याला पुढील काही सामने संघात स्‍थान मिळाले नाही.  मात्र जेव्‍हा त्‍याला पुन्‍हा एकदा संधी मिळाली. त्‍याने त्‍याचे सोने केले. ९ सामन्‍यांमध्‍ये त्‍याने १४ बळी घेतले. दिल्‍ली कॅपिटल्‍सविरुद्ध च्‍या सामन्‍यात त्‍याने केवळ १६ धावा देत ४ बळी घेतले. हे त्‍याचे सर्वोत्‍कृष्‍ट प्रदर्शन राहिले. हा डाखखुरा वेगवान गोलंदाज माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आणि इरफान पठाण यांचा वारसदार ठरेल, असे मानले जात आहे. फलंदाजांना चकीत करण्‍याची ताकद असणारी त्‍याची गोलंदाजी निवड समितीला त्‍याचा विचार करायला लावणारी ठरणार आहे.

IPL 2022 Fast Bowlers : मुकेश चौधरीने संधीचे केले सोने

यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये चेन्‍नई सुपर किंग्‍सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा जखमी झाला. त्‍यामुळे मुकेश चौधरीला संघात स्‍थान मिळाले. त्‍याने नेत्रदीपक कामगिरी करत सर्वांना चकीत केले. त्‍याने १३ सामन्‍यात १६ बळी घेतले. विजय हजारे ट्रॉफीमध्‍ये तो महाराष्‍ट्र संघाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. आयपीएलच्‍या पुढील सीजनमध्‍ये तो चेन्‍नईच्‍या संघात दीपक जाहरबरोबर असेल. डावखुरा वेगवान गोलंदाज म्‍हणून त्‍याला भविष्‍यात भारतीय क्रिकेट संघात संधी मिळण्‍याची शक्‍यता आहे.

अचूक मारा करणार यश दलाल

गुजरात टाइटंस संघाने पदार्पणातच आयपीएल चषकाला गवसणी घातली आहे. या यशात वेगवान गोलंदाज यश दलाल याने महत्त्‍वपूर्ण योगदान दिले. त्‍याने ९ सामन्‍यांमध्‍ये ११ बळी घेतले. सामन्‍यात अत्‍यंत चुरशीच्‍या क्षणी विकेट घेत त्‍याने आपले महत्त्‍व सिद्ध केले आहे. वेगाबरोबर बॉल स्‍विंग करण्‍याची त्‍याची क्षमता त्‍याला भारतीय क्रिकेट संघात संधी देईल, असे मानले जात आहे.

दिग्‍गज फलंदाजांना आव्‍हान देणारा कुलदीप सेन

२००८ नंतर प्रथमच यंदाच्‍या सीजनमध्‍ये राजस्‍थान रॉयल्‍स संघ आयपीएलच्‍या फायनलमध्‍ये पोहचला. यामध्‍ये वेगवान गोलंदाज कुलदीप सेन यांचे महत्त्‍वपूर्ण योगदान राहिले आहे. कुलदीप सेन याने ७ सामन्‍यांमध्‍ये आठ बळी घेतले. बंगळूर विरुद्धच्‍या सामन्‍यात त्‍याने २० धावात चार बळी घेतले. कुलदीप हा सलग ताशी १४५ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करु शकतो. यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये दिग्‍गज फलंदाजांना
आव्‍हान देणारा या खेळाडूने आपल्‍या कामगिरीत सातत्‍य ठेवल्‍यास भविष्‍यात भारतीय क्रिकेट संघात आपली जाग निर्माण करु शकतो.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news