अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात पदयात्रा काढणे व गर्दी जमविणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र झालेली गर्दी पाहून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी नगर शहर जिल्हा काँग्रेसचे कौतूक करत अदृश्य शक्ती काँग्रेससोबत असल्याचा दावा केला. पदयात्रेदरम्यान शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलेल्या जोरदार शक्ती प्रदर्शनाचे कौतूक करतानाच आ. थोरात यांनी त्यांच्या उमेदवारीचे सूतोवाच केले. आ. थोरात, आ. रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात काँग्रेसने संवाद यात्रा काढली.
त्यानंतर चितळे रोडवर आयोजित सभेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली. शिवकालीन खेळांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. काळे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करत यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करत शहराच्या ग्रामदैवत विशाल गणपतीची आरती केली. भिंगरवाला चौकातील जैन मंदिराला भेट दिली. दर्ग्याला चादर अर्पण केली.
आ. थोरात म्हणाले, व्यापार निम्मा राहिला नाही, असे बाजारपेठेतले व्यापारी संवाद साधताना सांगत होते. तुम्ही काहीतरी करा. काही लोक वातावरण खराब करतात. दहशत करतात, जाती, जातीत भेद निर्माण करतात. यामुळे व्यापार खराब होतो. आम्हाला शांत आणि बंधुत्वाचा वातावरण तसेच सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार वातावरण शहरात करायचा आहे. पण त्यासाठी किरण काळेंना आमदार व्हावं लागेल, असं म्हणत विधानसभेसाठी काळेंच्या उमेदवारीचे थेट सुतोवाच आ. थोरात यांनी केले. यात्रा एमजी रोडवर येताच कार्यकर्त्यांनी काळेंना खांद्यावर घेत जोरदार घोषणाबाजी केली. शहाजीराजे चौकात जेसीबीतून नेत्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
शहरात दहशतीच वातावरण आहे. स्व.अनिलभैय्या यांनी गुंडगिरी विरुद्ध लढा दिला, संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने शहराचा मोठा तोटा झाला. प्रश्न पडला इथून पुढे ही लढाई कोण करणार. शहराच्या पाठीशी कोण उभा राहणार आणि त्यावेळेस किरण काळे हे नेतृत्व आम्हाला दिसलं. हा गडी ना खायला मिळल म्हणून जाईल, ना दहशतीला घाबरल. तो भक्कम, हिम्मतवाला आहे.
गरीबाच्या पाठीशी उभी राहण्याची त्याची ताकद, इच्छा आहे. जिथे अन्याय तिथ किरण. तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नगरकरांसाठी लढाई करू शकतो. रॅलीत कार्यकर्ते एवढे उत्साही होते की, त्यांनी किरणला खांद्यावर घेत मिरवणूक आत्ताच काढली. खरंतर ती आमदार झाल्यावर आपल्याला काढायची आहे असे थोरातांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी शंभर टक्के ते आमदार होणार, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.
आ. धंगेकर म्हणाले, मराठा, धनगर, ओबीसी सगळ्यांना या सरकारने आश्वासन दिली. पण आता हात वर केले. समाजाला चांगलं, वाईट कळत असतं. किरण काळेंनी जे पेरल आहे ते भविष्यात नक्की उगवेल, असं म्हणत धंगेकरांनी काळेंचं कौतुक केलं. कसब्यातील ऐतिहासिक विजयाबद्दल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने किरण काळेंच्या हस्ते यावेळी धंगेकरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला वर्षपूर्ती झाल्या निमित्त हवेत तिरंगा फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
हेही वाचा