Milan Derby : इंटर मिलानचा एसी मिलानवर विजय

Milan Derby : इंटर मिलानचा एसी मिलानवर विजय

सॅन सिरो; वृत्तसंस्था : इंटर मिलानने चॅम्पियन्स लीग उपांत्य लढतीतील पहिल्या फेरीत एसी मिलानचा 2-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला आणि 2010 नंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा जिंकण्याच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली. इंटर मिलानतर्फे एडिन झेको व हेन्रिक यांनी प्रत्येकी एक गोल केला. दोन्ही संघातील परतीची लढत आता याच ठिकाणी मंगळवारी होणार असून यातील विजेत्या संघाची फायनल रियल माद्रिद किंवा मँचेस्टर युनायटेड यांच्यापैकी एकाविरुद्ध होईल. (Milan Derby)

पहिल्या सत्रात नवव्या मिनिटाला एडिन झेकोने व्हॉलीवर गोलपोस्टचा अचूक वेध घेतला. 37 वर्षीय बोस्नियन स्ट्रायकर झेको यादरम्यान चॅम्पियन्स लीग उपांत्य फेरीत गोल नोंदवणारा दुसरा वयस्कर खेळाडू ठरला. सध्या यातील सर्वोच्च विक्रम मँचेस्टर युनायटेडच्या रियान गिग्जच्या खात्यावर आहे. झेकोने यापूर्वी व्हेरोनाविरुद्ध 6-0 विजयात देखील दोन गोल केले होते. (Milan Derby)

आजवर तीनवेळा युरोपियन चॅम्पियन्स ठरलेल्या इंटर मिलानने हॅकनच्या अप्रतिम कॉर्नरमुळे आघाडी घेतली. हॅकनच्या कॉर्नरवर झेकोने उजव्या बाजूने गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला. सलग चार सिरी ए विजयानंतर मनोबल उंचावलेल्या इंटरतर्फे हेन्रिकने 11 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. दिमॅर्कोच्या महत्त्वपूर्ण पासवर अर्मेनियन हेन्रिकने संघाचा दुसरा गोल केला. अवघ्या 3 मिनिटांतील या दोन गोलमुळे मिलानचे सामन्यावर उत्तम वर्चस्व प्रस्थापित केले.

बदली खेळाडू पोबेगाला मिलानतर्फे गोल करण्याची नामी संधी चालून आली होती. पण, गोलरक्षक आंद्रे ओनानाने पोबेगाचे पेनल्टी एरियातून केलेले आक्रमण सफाईदारपणे परतावून लावले. 'आम्ही निकालावर खूश आहोत. पण, अद्याप आमचा खेळ अपेक्षेप्रमाणे होत नाही, ही वस्तुस्थिती आहे,' असे इंटरचे प्रशिक्षक सिमोन इन्झगी विजयानंतर म्हणाले.

इंटरने आपल्या शेजारी संघाला युरोपियन नॉकआऊट टायमध्ये पराभूत करण्याची ही पहिली वेळ असून यापूर्वी बाद फेरीतील दोन लढतीत एसी मिलाननेच बाजी मारली होती. यापूर्वी, दोन्ही संघ 2004-05 चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आमने-सामने भिडले होते.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news