Thane Kalwa Hospital : रुग्णाच्या जांघेत इंजेक्शनची सुई तुटली; कळवा रुग्णालयाचा निष्काळजीपणा

Thane Kalwa Hospital : रुग्णाच्या जांघेत इंजेक्शनची सुई तुटली; कळवा रुग्णालयाचा निष्काळजीपणा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे रुग्णांची हेळसांड अद्यापही सुरूच असून असाच एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. उपचारांसाठी आलेल्या एका मुलीच्या जांघेत इंजेक्शन देत असताना इंजेक्शनची सुई जांघेतच तुटली. या प्रकाराला १६ दिवस होऊनही अद्याप याकडे लक्ष द्यायला डॉक्टरांना वेळ नसल्याचे ट्विट राष्ट्रावादीचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सुई आतमध्ये राहिली होती अशी कबुली रुग्णालयाच्या वतीने देखील देण्यात आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी निष्काळजीपणामुळे एका रात्रीत झालेल्या १८ मृत्यूनंतरही कळवा रुग्णालयाकडून निष्काळजीपणाचे प्रकार सुरूच असल्याने रुग्णांमध्येही भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. (Thane Kalwa Hospital)

दोन महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यूंमुळे संपूर्ण राज्यात पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले होते. चौकशी समितीनेही एक महिन्यांपेक्षा जास्त वेळ घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. मात्र या प्रकरणात ठोस कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. आता याच रुग्णालयाचे आणखी एक निष्काळजीपणाचे उदाहरण समोर आले आहे. एक महिन्यांपूर्वी आयमन शेख ही मुलगी उपचार घेण्यासाठी कळवा रुग्णालयात आली होती. यावेळी तिला इंजेक्शन देताना सुई जांघेतच तुटली. मात्र १६ दिवस उलटूनही याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही असे ट्विट करून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 16 दिवस झाले ठाण्यातील एका मुलीच्या जांघेमध्ये इंजेक्शन देत असताना सुई तुटली. 16 दिवसानंतरही सुई तिथेच आहे. कोणिही लक्ष द्यायला तयार नाही. ती सुई काढण्यासाठी लहानशी सर्जरी करावी लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु त्यासाठी रुग्णालयामध्ये डॉक्टरही नाहीत. आता त्या मुलीचा पाय सुजायला लागला आहे. जर त्याच्यात काही बरेवाईट झाले तर त्या मुलीचा पाय कापावा लागेल.इतका निष्काळजीपणा डॉक्टर्स कसे काय करू शकतात आणि मुख्य म्हणजे इंजेक्शन देत असताना सुई तुटतेच कशी? असे प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केले आहे.

यासंदर्भात कळवा रुग्णालयाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एक महिन्यांपूर्वी आयमन शेख ही मुलगी रुग्णालयात दाखल झाली होती. तिला निमोनिया होता. खूप गंभीर परिस्थीत तिला आणण्यात आले होते. सलाईन लावण्यासाठी नस मिळत नसल्याने, तिच्या पायातून सेंट्रल लाईन गाईड वापर करून पायाच्या नस मधून इंजेक्शन देण्यात येत होते. दरम्यान तिच्या शरीरात ती गाईड वायर राहिली. इंटरवेनायल रेडिओलॉजिस्ट आणि कर्डियक सर्जन नसल्याने तिला जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news