कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरण : डीनसह सर्वच डॉक्टरांची कसून चौकशी, महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात | पुढारी

कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरण : डीनसह सर्वच डॉक्टरांची कसून चौकशी, महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ मृत्यू झाल्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने गुरुवारी आठ तास रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा या समितीने रुग्णालयात जाऊन काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यातही येथील मुख्य अधिष्ठता यांच्यासह इतर डॉक्टरांची देखील कसून चौकशी केल्याची सूत्रांनी माहिती दिली.

कळवा हॉस्पीटलमध्ये मागील आठवड्यात मृत्यूचे तांडव घडल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीला आपला अहवाल २५ ऑगस्ट पूर्वी द्यायचा आहे. त्यानुसार या समितीने गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत कळवा रुग्णालयाची झाडाझडती घेतली. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील आठवड्यात गुरुवारी ५ जणांचा त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर पुढील दोन दिवसात आणखी सहा रुग्णांचा मृत्यु झाला होता. हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी याठिकाणी हजेरी लावून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. काहींनी तर या प्रकरणाची श्वेत पत्रिका काढण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार या समितीच्या माध्यमातून गुरुवारी महापालिका मुख्यालयात हजेरी लावली होती. त्यांनी त्याठिकाणी तीन तास चौकशी केल्यानंतर सांयकाळी सातच्या सुमारास कळवा रुग्णालयाकडे धाव घेतली. त्याठिकाणी रात्री ११ वाजेपर्यंत पाहणी आणि चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

या चौकशीत येथील मुख्य अधिष्ठता यांच्यासह रुग्णांवर उपचार करणाºया सर्वच डॉक्टरांची कसुन तपासणी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शिवाय प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळतात की नाही, याची देखील खातरजमा केली आहे. तसेच रोज उपचारासाठी किती रुग्ण येतात?  किती शस्त्रक्रिया होतात? शिवाय ज्या रुग्णांचा मृत्यु झाला त्यांची देखील माहिती घेतली गेली आहे. त्यातही त्यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाली, याची माहिती देखील त्यांनी घेतली आहे. तसेच मृत पावलेला प्रत्येक रुग्ण केव्हा दाखल झाला होता, त्याच्यावर काय काय उपचार करण्यात आले, कोणती औषधे देण्यात आली याची देखील माहिती घेतली गेली आहे. गुरुवारी दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत महापालिका मुख्यालय आणि कळवा रुग्णालयात या समितीमधील प्रमुखांनी झाडाझडती घेतली असून रुग्णासंदर्भातील महत्वाची कागदपत्रे देखील आपल्या ताब्यात घेतली आहेत. तसेच ज्या ज्या रुग्णांचे पोर्स्टमार्टन झाले होते, त्यांचे अहवाल देखील ताब्यात घेतले आहेत. तर एकाचा व्हीसेरा अहवाल प्राप्त होऊ शकलेला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर शुक्रवारी देखील दुपारी दोन वाजता या समिती मधील सदस्यांनी कळवा रुग्णालयात हजेरी लावली होती. त्यावेळस काही शिल्लक कागदपत्रे देखील त्यांनी आपल्या ताब्यात घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button