ठाणे : कळवा रुग्णालयातील मृत्यूंच्या अहवालावरून काँग्रेस आक्रमक | पुढारी

ठाणे : कळवा रुग्णालयातील मृत्यूंच्या अहवालावरून काँग्रेस आक्रमक

ठाणे : पुढारी वृत्तसेवा – एक महिना उलटून घेतल्यानंतरही कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल जाहीर झाला नाही. त्यामुळे ठाण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सोमवारी कळवा रुग्णालयात जाऊन रुग्णलायचे डीन डॉ. राकेश बारोट यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. राज्याचे विरोधी पक्षनेतेने विजय वडेट्टीवार यांनी ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी स्वतः रुग्णालयात जाऊन त्वरित अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप अहवाल सादर न झाल्याने या अहवालाबाबत सद्धस्थिती काय आहे, याचा जाब काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रुग्णालय प्रशासनाला विचारला. याशिवाय वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी देखील केली.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एक १२ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी १८ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते. तर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरच या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही घटना घडल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासन आणि चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. जे खुनी त्यांच्याच हाती चौकशी समिती दिली आहे. त्यामुळे चौकशी काय होणार हे यातून दिसत आहे. या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल तर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून त्यांच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

शहर सौंदरीकरणावर कोटींचा खर्च केला जात आहे, मुख्यमंत्री ग्लोबलचे स्वप्न दाखवत आहेत. मात्र इकडे लोकांचे जीव जात असताना त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत असून महाराष्ट्रात सत्तेच्या साठ मारीत जनतेचा जीव धोक्यात आल्याचा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी केला होता.

एक वेळ मुदतवाढ देऊनही अद्याप हा अहवाल जाहीर करण्यात आला नसल्याने सोमवारी काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश जाधव तसेच अन्य काँग्रेसचे पदाधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली. तसेच डीनची भेट घेऊन त्यांना अहवाला संदर्भात विचारणा केली. रुग्णालयाकडून सर्वप्रकारची माहिती चौकशी समितीला देण्यात आली असताना अहवाल सादर करण्यास जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा आरोप मनोज शिंदे यांनी केला आहे. या ठिकाणी जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील शिंदे यांनी केली. स्वतः पालिका आयुक्त या चौकशी समितीचे सदस्य असून अहवाल लवकर जाहीर झाला नाही तर आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

Back to top button