बीड : उदय नागरगोजे
आई-वडील शेतकरी…घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच…खेळात प्राविण्य मिळवले तर नोकरी लवकर मिळेल म्हणून विविध क्रिडा स्पर्धांमध्ये सहभाग अन् सराव करणारा अविनाश सहावीपासूनच औरंगाबादच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाला. तेथे प्रशिक्षण घेतले पण चांगले प्रदर्शन करता न आल्याने दहावीनंतर प्रबोधिनी सोडावी लागली. त्यानंतरही हार न मानता 'अडथळे' दूर करण्यासाठी धावतच राहिलेला अविनाश आता अजिंक्य ठरतोय…!
आष्टी तालुक्यातील मांडवा या गावातील अविनाश साबळे देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्वल करतोय. अगदी प्राथमिक शिक्षणासाठी त्याला घरापासून पाच ते सहा किलोमीटर दूर असलेल्या शाळेत जावे लागायचे. आई वैशाली साबळे व वडील मुकूंद साबळे हे शेतकरी असल्याने त्यांना शेतात लागेल त्या कामात मदत करणेही ओघाने आलेच. शेतीतील उत्पन्नात घर चालवण्यासाठी वडिलांना करावी लागणारी कसरत अविनाशने जाणली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्याने खेळातच करिअर करण्याचे निश्चित केले. त्याच्यात असलेल्या उपजत प्रतिभेमुळे सहावीच्या वर्गात असतानाच क्रीडा प्रबोधिनीच्या चाचणीत उत्तीर्ण झाला. त्याला औरंगाबाद येथील प्रबोधिनीत प्रवेश मिळाला. तेथून पुढील चार वर्षाचे शिक्षण त्याच ठिकाणी झाले. परंतु दहावीनंतर चांगले प्रदर्शन करु न शकल्याने त्याच्यावर प्रबोधिनी सोडण्याची वेळ आली.
गावी परतल्यानंतर कडा येथे महाविद्यालयीन शिक्षण सुरु ठेवून सैन्य भरतीची तयारी सुरु केली. त्याच्या या प्रयत्नाला 2012 मध्ये यश आले. उस्मानाबाद येथे झालेल्या सैन्य भरतीच्या चाचणीत अविनाश उत्तीर्ण झाला. सैन्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यातील क्रीडा कौशल्य वरिष्ठांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला 2016 पासून पूर्णवेळ खेळासाठी वेळ देण्यास परवानगी दिली. सैन्य दलाने दिलेल्या या पाठिंब्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही. 2017 ला पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. यानंतर 2018 व 19 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले. तसेच 2018 मध्येच आशियाई स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत तीन हजार मिटर स्टिपलचेस स्पर्धेत 37 वर्षांपूर्वीचा विक्रम त्याने मोडीत काढला.
आता नुकतेच त्याने अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत तीस वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढत यश मिळवले आहे. अविनाशचे हे यश ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणादायी असेच आहे.
अविनाशच्या यशाचा आलेख उंचावत असताना त्याला टोकिओ ऑलंम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत तो नक्कीच पदक मिळवेल अशी अपेक्षा होती. परंतु स्पर्धेच्या पंधरा दिवस आधीच त्याला कोरोनाने गाठले. यामुळे त्याला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
अविनाश साबळे हा तीन हजार मिटर स्टिपलचेस या क्रिडा प्रकारातील खेळाडू आहे. परंतु त्याने राष्ट्रीय स्तरावर पाच हजार मिटर धावण्याच्या स्पर्धेसाठी सराव केला व सहभागही घेतला. तेथे यश मिळाल्यानंतर तो अमेरिकेतील स्पर्धेत सहभागी झाला. तेथे त्याने 7 मे रोजी 1992 मध्ये बहादूर प्रसाद यांनी नोंदवलेला विक्रम मोडला.
अविनाश साबळे हा 2022 मध्ये होणार्या एशियन गेम, कॉमनवेल्थ गेम, अमेरिकेत होणार्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे. यासाठीची त्याची तयारी सुरु असल्याचे त्याचे भाऊ योगेश साबळे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. परंतु त्यांना योग्य प्रशिक्षण व कुटुंबाचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक बाबी त्यांना अवगत व्हायला हव्यात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे खेळाडू आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत. तरच ते खेळाला पूर्णवेळ देऊन देशाचे नाव उज्वल करु शकतात असे मत अविनाश साबळे याचा भाऊ योगेश साबळे याने व्यक्त केले.
हल्ली मुलांना खेळत काय बसलास, अभ्यास कर असे संवाद घरोघर ऐकायला मिळतात. परंतु साबळे कुटुंबात मात्र वेगळे आहे. अविनाश आणि योगेशला त्यांचे आई – वडील खेळत काय बसलास, अभ्यास कर असे कधी म्हटलेच नाही. खेळासाठी पूर्णपणे पाठिंबा दिल्यानेच अविनाश हे यश मिळवू शकला.