आयपीएल 2022 मधील सुमार पंचगिरीमुळे खेळाडू व्यथित | पुढारी

आयपीएल 2022 मधील सुमार पंचगिरीमुळे खेळाडू व्यथित

मुंबई ; वृत्तसंस्था : आयपीएल 2022 मधील सुमार पंचगिरीचा आणखी एक किस्सा नव्याने समोर आला असून योग्य निर्णय घेतल्याबद्दल संजू सॅमसनचे कौतुक होत आहे. त्याच वेळी त्याने चुकीचा पायंडा पाडल्याचेही समोर आले आहे.

सोमवारी राजस्थान आणि कोलकाता यांच्यात खेळला गेलेल्या सामन्यात मजेदार घटना घडली. कोलकाताच्या डावातील तेराव्या षटकात श्रेयस अय्यरला ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारायचा होता. मात्र चेंडू संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये गेला आणि त्याने जोरदार अपील केले. मात्र, पंचांनी त्याला बाद न देता चेंडू वाईड घोषित केला.

संजूने लगेच तिसर्‍या पंचांकडे दाद मागितली. रिप्लेमध्ये पंचांनी चूक केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. चेंडू अय्यरच्या ग्लोव्हजला लागला होता आणि तो बाद होता. त्यामुळे मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. श्रेयस 32 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. संजू सॅमसनच्या या निर्णयावर भाष्य करताना मोहम्मद कैफ आणि सुरेश रैनानेही त्याचे कौतुक केले.

हे कमी म्हणून की काय, कोलकाताच्या डावातील 19व्या षटकात वाईड चेंडूवरून वेगळेच नाट्य पाहायला मिळाले. प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत होता आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज रिंकू सिंग ऑफ-स्टंप आणि लेग-स्टंप असे शफल करत होता. प्रत्युत्तरात कृष्णानेही रिंकूला फॉलो केले. (आयपीएल 2022)

पंचांनी तो चेंडूही वाईड घोषित केला. त्यामुळे सॅमसन चिडला. पंचांच्या या निर्णयामुळे व्यथित झालेल्या संजूने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, रिंकूच्या बॅटपासून चेंडू खूप दूर होता आणि रिव्ह्यू घेण्यात काही अर्थच नव्हता. असे असले तरी वाईड चेंडू ठरवताना पंचांचा गोंधळ उडत असल्याचे वारंवार जाणवू लागले आहे. वाईड चेंडूबद्दलही कर्णधाराला रिव्ह्यू घ्यावा लागावा हे अजबच म्हटले पाहिजे.

Back to top button