भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल; डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात राज्यपाल बैस यांचे प्रतिपादन

भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल; डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात राज्यपाल बैस यांचे प्रतिपादन
Published on
Updated on

पिंपरी(पुणे) : पुढारी वृत्तसेवा : 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे निश्चित आहे. आता केवळ साक्षर होणे पुरेसे नाही. एआय साक्षर होणे आवश्यक आहे. मात्र, मानवी बुद्धी कोणत्याही एआयपेक्षा अधिक तरल आहे. माणूस प्रेमभाव जाणतो, याच भावनेतून आपण समाज आणि देशाची सेवा करू शकतो. आपण विश्वगुरू होतो आणि मला विश्वास आहे की, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल,' असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी व्यक्त केला. डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या चौदाव्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष श्री. अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रीज लिमिडेटचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि क्वालिटी अ‍ॅश्युरन्स अँड एक्सलन्स सेल, रामय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बंगळुरूचे प्रमुख सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्यासह देशभरातून आलेले विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात सोमवारी (दि. 14 ऑगस्ट) सकाळी झालेल्या या सोहळ्यास उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले, 'येत्या 2030 पर्यंत मशिन लर्निंगच्या माध्यमातून 40 ते 80 कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात, असा मॅकेन्झीचा अहवाल सांगतो. यातल्या 37.5 कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णतः बदलावी लागेल. एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशिन लर्निंगमुळे होणार्‍या बदलांना सामोरे जाता येईल. विद्यापीठांना माझा आग्रह असेल की, आपल्या शिक्षण व्यवस्थेत एआय आणि मशिन लर्निंगचा समावेश करण्यावर चिंतन झाले पाहिजे. या व्यवस्थेचा लाभ उठविण्यासाठी रणनीती आखावी लागेल. एआयमुळे शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल होणार आहेत. एआयच्या आगामी युगात आपल्याला निरंतर शिकत राहावे लागेल. प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी आपल्याला स्किल, रिस्किल, अपस्किलच्या माध्यमातून तयार व्हावे लागेल.'

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले, 'शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबतीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ तडजोड करीत नाही. त्यामुळेच नॅक मानांकनात चारपैकी 3.64 गुण विद्यापीठाला मिळाले असून, ए प्लस-प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशन फ्रेमवर्कच्या 2023 च्या आकडेवारीनुसार विद्यापीठाच्या दंतवैद्यकशास्त्र महाविद्यालयाला देशात तिसरा क्रमांक मिळाला. वैद्यकीय महाविद्यालयाने देशात एकविसाव्या क्रमांकावरून पंधराव्या स्थानावर झेप घेतली, तर विद्यापीठ गटात 46 वा क्रमांक मिळाला आहे.'

अरुण फिरोदिया म्हणाले, 'येथून बाहेर पडल्यानंतर जॉब गिव्हर्स व्हा, जॉब टेकर्स नको. भारताची प्रचंड लोकसंख्या ही समस्या नसून वरदान आहे. यातून इकॉनॉमी ऑफ स्केल शक्य आहे.' प्रमोद चौधरी म्हणाले, 'हवामान बदल हा मानवी अस्तित्वासाठी धोका ठरत आहे. भारताकडे बायोमास आणि शेतमालाचे अवशेष यांचे प्रमाण खूप मोठे आहे. यातून बायोफ्यूएल, बायोकेमिकल यांची निर्मिती शक्य आहे. यातून देशाला इंधन सुरक्षा लाभणार असून, पर्यावरणपूरक शाश्वत विकास साधता येणार आहे.' डॉ. पी. एन. राजदान म्हणाले, 'जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत लिथियमचा 5.9 दशलक्ष टन साठा शोधण्यात यश आले आहे. यातून प्रचंड आर्थिक विकास होणार आहे.'

33 सुवर्णपदके आणि 14 जणांना पीएच. डी.

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 33 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखांतील 4095 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 14 विद्यावाचस्पती (पीएच. डी.), 3015 पदव्युत्तर पदवी, 1055 पदवी व 11 पदविका, या अशा एकूण 8 विद्याशाखांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news