

पिंपरी(पुणे) : शासकीय पत्रांवर आता 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या बोध चिन्हाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि शौर्य अधोरेखित करणार्या मंगलचिन्हाचा वापर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार गृह विभागाने राज्यातील सर्व घटकप्रमुखांना आदेश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शासनाकडून शिवकालीन मंगलचिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणार्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर मराठी मनामनांत व्हावा, जगभरात जेथे मराठी माणूस आहे, तेथे या माध्यमातून महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहचावी, हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणार्या कार्यक्रमांच्या प्रचार/प्रसिद्धीत तसेच शासकीय पत्रव्यवहारात या मंगलचिन्हाचा वापर करण्यात येणार आहे. या तारखेपासून वापर होणार सुरू शासकीय पत्रव्यवहार करताना यापूर्वी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या बोधचिन्हाचा वापर केला जात होता. आता मंगळवारपासून (दि. 15) शिवकालीन मंगलचिन्हाचा वापर करण्यात येणार आहे. मराठी जनमानसांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब मानली जात आहे.
शासकीय पत्रव्यवहार करताना शौर्याचे प्रतीक असलेल्या मंगलचिन्हाचा वापर सुनिश्चित करण्यात आला आहे. यासोबतच सर्व पोलिस कार्यालयांच्या दर्शनी भागातही हे मंगलचिन्ह लावण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 वर्षपूर्तीनिमित्त शिवकालीन मंगलचिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणार्या सुनिश्चित केलेल्या विशेष बोधचिन्हाचा शासकीय कामकाजात वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलिस आयुक्त कार्यालयातील सर्व विभाग/शाखा यांना सर्व शासकीय पत्रव्यवहार करताना शिवकालीन मंगलचिन्हाचा वापर कण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
हेही वाचा