रुपया झाला छोटा; गेल्या 67 वर्षांत एका डॉलरचा दर 4.79 वरून पोहचला 83 पार

रुपया झाला छोटा; गेल्या 67 वर्षांत एका डॉलरचा दर 4.79 वरून पोहचला 83 पार

पुणे : कधी काळी एका अमेरिकन डॉलरसाठी भारतीयांना चार रुपयांहून कमी रक्कम मोजावी लागत होती. गेल्या 75 वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत डॉलर रुपयाच्या तुलनेत अधिक सशक्त झाला असून, त्याने 83 अंकांचा टप्पा पार केला आहे. म्हणजेच, एका डॉलरसाठी आपल्याला 83 रुपये मोजावे लागत आहेत. डॉलरच्या दरावर अनेक घटक परिणाम करतात. त्यात आयात-निर्यातीतील तफावत, महागाई, आंतरराष्ट्रीय इंधनाचे दर, मंदी, तुटीचा अर्थसंकल्प असे घटक खासकरून परिणाम करतात. गेल्या सहा-सात दशकांत रुपयाचे अवमूल्यन वेगाने झाले आहे. देशातील रुपयाचा दर मार्च 2014 साली 60.01 रुपये होता. त्या वेळी विरोधकांनी रुपयाच्या होत असलेल्या अवमूल्यनावर बोट ठेवत रणकंद माजविले होते. देशाच्या इभ्रतीशी संबंध जोडायला विरोधकांनी कमी केले नाही. मात्र, विरोधक सत्तेत आल्यावर

तेदेखील रुपयाला सावरू शकले नाहीत. उलट सध्याच्या सत्ताधार्‍यांच्या कालावधीतच रुपया ऐतिहासिक 83.26 रुपये या नीचांकी पातळीवर गेला. सोमवारी (दि. 14) डॉलरच्या तुलनेत रुपया 83.08 डॉलर इतका नोंदला गेला. साधारणपणे 1948 ते 1967 या कालावधीत एका डॉलरसाठी 4.79 रुपये मोजावे लागत होते. त्यानंतर रुपया अशक्त होण्यास सुरुवात झाली. विशेषतः 1975 पासून रुपयाचे अवमूल्यन होत आहे. फेब्रुवारी 1975 साली एका डॉलरसाठी 7.52 रुपये मोजावे लागत होते. त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत तो 43.6 डॉलरवर पोहचला.

नऊ वर्षांत 23 रुपयांनी अवमूल्यन…

गेल्या 23 वर्षांत डॉलरच्या दरात तब्बल 40 रुपयांनी वाढ झाली. त्यातही गेल्या नऊ वर्षांत 23 रुपयांनी डॉलर वधारला आहे. मार्च 2014 साली डॉलरचा दर 60.01 रुपये होता. त्यात आता 83.08 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news