IND vs PAK World Cup : गिलचे होणार पुनरागमन? अश्विन-शार्दुल-शमीपैकी कुणाला संधी? अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

IND vs PAK World Cup : गिलचे होणार पुनरागमन? अश्विन-शार्दुल-शमीपैकी कुणाला संधी? अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK World Cup : विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाची आता 14 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत 'लढाई' होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघांमध्ये हा महामुकाबला रंगणार आहे. तथापि, भारतीय संघ आपले पहिले दोन सामने जिंकल्यानंतर ड्रायव्हिंग सीटवर असल्याचे दिसत आहे, परंतु असे असूनही, टीम इंडियामध्ये काही कमतरता आहेत. या दुरुस्त केल्यास टीम इंडियाची विजयी मोहीम आणि विश्वचषक जिंकण्याचा दावा अबाधित राहील.

भारत पूर्ण करणार विजयाची हॅट्ट्रिक? (IND vs PAK World Cup)

टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. रोहित शर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर संघाला मोठा विजय मिळाला. आता भारतीय संघाचे टार्गेट विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याकडे असेल. शनिवारी अहमदाबादमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला, तर वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध अजिंक्य राहण्याचा सिलसिला कायम राहणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये ने सात सामने झाले असून यात प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. (IND vs PAK World Cup)

गिलबाबत शंका कायम?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मासमोर योग्य प्लेइंग-11 निवडण्याचे आव्हान आहे. स्टार युवा सलामीवीर शुभमन गिल पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नाही. डेंग्यूमुळे तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांना मुकला. त्यावेळी गिलच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, त्याची प्रकृतीत सुधारणा झाली आहे. बुधवारी रात्री तो चेन्नईहून थेट अहमदाबादला पोहोचला आणि गुरुवार आणि शुक्रवारी सुमारे तासभर त्याने नेटवर सराव केला.

रोहित शर्माकडून गिलबाबत अपडेट (IND vs PAK World Cup)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्याने अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. गिलच्या प्रकृतीबद्दलही मोठा खुलासा करताना रोहितने तो 99 टक्के बरा झाला असल्याची अपडेट दिली. दरम्यान भारतीय कर्णधाराच्या या माहितीवरून गिल हा जवळजवळ पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे समजत आहे. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. पण जर गिल या सामन्यात खेळला नाही तर टीम इंडियाचे मोठे नुकसान होऊ शकते.

अहमदाबाद गिल का महत्त्वाचा?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गिल हा भारतीय प्लेईंग इलेव्हनचा भाग असणे खूप महत्त्वाचे आहे. याला कारण म्हणजे त्याचे अहमदाबादच्या मैदानावरील गिलचा विक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. या मैदानावर त्याने फक्त टी-20 सामने खेळले असले तरी गिलच्या बॅट नेहमीच तळपली आहे. या मैदानावर त्याने तीन टी-20 शतके झळकावली आहेत. यात आयपीएलमधील दोन शतकांचा समावेश आहे. त्याने या वर्षी वनडेमध्ये 72.35 च्या सरासरीने आणि 105.03 च्या स्ट्राइक रेटसह 1230 धावा चोपल्या आहेत. मागील चार एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक फटकावले आहे.

गिल पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर…

पण गिल जर पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर भारतीय संघ व्यवस्थापनाला कोणताही धोका पत्करायचा नाही. स्पर्धेत अजून बरेच सामने खेळायचे बाकी असून शुभमनची आणखी गरज भासेल. अशा स्थितीत कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या युवा सलामीवीराला पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच त्याला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट करतील. गिल फिट नसेल तर इशान किशनला पुन्हा एकदा संधी मिळेल. (IND vs PAK World Cup)

टीम इंडियाला सुधारणांची आवश्यकता (IND vs PAK World Cup)

सलग दोन सामने जिंकल्यानंतरही टीम इंडियाला अजूनही काही विभागांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. गिलच्या अनुपस्थितीत इशानला संघात स्थान मिळाले. त्याने कर्णधार रोहितसह डावाची सुरुवात केली. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात साफ निराशा केली. त्याने अत्यंत बेजबाबदारपणे शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्यानंतर दिल्लीत अफगानिस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने 47 धावा केल्या. पण त्याच्या डावात फारसा आत्मविश्वास दिसत नव्हता.

सिराजच्या जागी शमीला संधी मिळेल का?

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानविरुद्ध 39 धावांत चार विकेट्स घेतल्या, पण दुसऱ्या टोकाला मोहम्मद सिराज महागडा ठरला. गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानावर असला तरी या स्पर्धेत त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. सिराजने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्या प्रकारची कामगिरी केली होती, त्याची पुसटशी सर त्याच्या वर्ल्डकपमधील गोलंदाजी आलेली नाही, असे काही तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. पण त्या कामगिरीच्या जोरावर त्याला संघातून बाहेर बसणे कठीण झाले आहे. पण मागील दोन सामन्यांचे रेकॉर्ड पाहता त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळेल असा अंदाज आहे. शमीचा विश्वचषकातील विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग-11 मध्ये ठेवावे, असे अनेकांचे मत आहे. तो आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघात असून त्याला अहमदाबादच्या खेळपट्टीवर उपयुक्त मारा करण्याचा भरपूर अनुभव आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात शमीने या मैदानावर नऊ सामन्यांत 17 बळी घेतले आहेत.

शार्दुल ठाकूरला बाहेर बसावे लागणार? (IND vs PAK World Cup)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळलेला अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाली नाही. त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले. अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला. अश्विनला वगळण्यात आल्याने माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनाही आश्चर्य व्यक्त केले. शार्दुलने अफगाणिस्तानविरुद्ध सहा षटकांत 31 धावांत एक बळी घेतला. त्याचवेळी अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण 10 षटके टाकली होती. त्याने 34 धावांत एक विकेट घेतली. आता अश्विन संघात सामील होतो की शार्दुल कायम राहतो हे पाहावे लागेल. (IND vs PAK World Cup)

पाकिस्तान संघात बदल होणार नाही?

पाकिस्तान संघाने गेल्या सामन्यातच मोठा बदल केला होता. त्यांनी अनुभवी सलामीवीर फखर जमानच्या जागी अब्दुल्ला शफिकला संधी दिली. शफिकने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. बाबर आझमच्या फॉर्ममुळे संघ चिंतेत आहे. त्याला दोन सामन्यांत केवळ 15 धावा करता आल्या आहेत. शाहीन आफ्रिदीलाही गोलंदाजीत फारसे काही करता आले नाही.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/रविचंद्रन अश्विन.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news