पुढारी ऑनलाईन : काश्मीर प्रश्नी तुर्की आणि पाकिस्तानने केलेल्या वक्तव्यावर भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारताने याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर काश्मीर प्रश्नी तुर्की आणि पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ५५ व्या मानवाधिकार परिषदेत, जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख केल्याबद्दल तुर्की आणि पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने 'राइट टू रिप्लाय'चा वापर केला.
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतील भारताच्या पहिल्या सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले. पाकिस्तानने काश्मीर प्रश्नी भारताच्याविरोधात गंभीर आरोप केले आणि तुर्कीने पाकिस्तानच्या वक्तव्याचे समर्थन केले होते.
सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा ही भारताची "अंतर्गत बाब" आहे आणि भविष्यात या विषयावर अशा "अनपेक्षित टिप्पण्या" टाळव्यात असे सांगून तुर्कीला कडक शब्दांत इशारा दिला. तसेच त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली.
त्या म्हणाल्या की, ज्या देशाने स्वतःच्या अल्पसंख्याकांवर अत्याचार केले आहेत. याचे उदाहरण म्हणजे ऑगस्ट २०२३ मध्ये पाकिस्तानातील जारनवाला येथे अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदायावर क्रूरपणे अत्याचार करण्यात आले. १९ चर्च नष्ट करण्यात आले आणि ८९ ख्रिश्चन समुदायाची घरे जाळण्यात आली. जो दहशतवाद्यांना आश्रय देतो आणि समर्थन देतो त्या देशाने भारताबाबत भाष्य करणे हा विरोधाभास आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा उल्लेख केल्यानंतर भारताने तीन मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पहिला म्हणजे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे "भारताचे अविभाज्य भाग" आहेत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये "सामाजिक-आर्थिक विकास आणि सुशासन" सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने केलेल्या घटनात्मक उपाययोजना भारताच्या अंतर्गत बाबी आहेत.
या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत त्यांनी तुर्की आणि पाकिस्तानला सुनावले.
हे ही वाचा :