पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात येत्या सोमवारपर्यंत शस्त्रसंधी होईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. इस्रायल आणि हमास यांच्या प्रतिनिधींत कतारमध्ये चर्चा सुरू आहेत, यात काही प्रगती झालेली आहे, असेही बायडेन यांनी म्हटले आहे. (Israel Gaza war)
बायडेन म्हणाले, "अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या घडमोडींवर लक्ष ठेऊन आहेत. या आठवड्याच्या अखेरीस किंवा सोमवारपर्यंत शस्त्रसंधीवर तोडगा निघेल." ही बातमी बीबीसीने दिली आहे.
हमास आणि इस्रायल यांच्यात ७ ऑक्टोबरपासून भीषण संर्घष सुरू आहे. हमासने इस्रायलवर काही हजार क्षेपणास्त्र एकाच वेळी डागली यात १२०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच हमासने २५३ इस्रायली नागरिकांना बंधक बनवले. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ले सुरू केले, यात २९७८२ पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला. (Israel Gaza war)
अमेरिका हा सातत्याने इस्रायलचा पाठीराखा देश राहिलेला आहे. त्यामुळे या संर्घषात अमेरिकेची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. न्यू यॉर्कमध्ये ज्यो बायडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "आतापर्यंत तरी काही झालेले नाही, पण सोमवारपर्यंत यात मार्ग निघेल."
अमेरिकेच्या गृह विभागच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार हमासने इस्रायच्या नागरिकांना बंदी बनवले आहे, त्यांना तातडीने मुक्त करावे, या अनुषंगाने चर्चा सुरू आहेत. "या चर्चांत इजिप्त, इस्रायल, अमेरिका आणि कतारचे प्रतिनिधीही सहभागी आहेत," असे प्रवक्ते मॅथ्यु मिलर यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत गाझात तातडीने युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव आला होता. तो अमेरिकने रोखल्यानंतर यावर जगभरात टीका झाली होती. पण अमेरिकेने इस्रायलला राफाह शहरावर हल्ले करू नयेत असे खडसावले, आणि तात्पुरत्या शस्त्रसंधीचा स्वतःचा प्रस्ताव सादर केला.
दरम्यान पॅलेस्टाईन अॅथॉरिटीचे पंतप्रधान मोहम्मद शतयेह यांनी राजीनामा दिली आहे. पॅलेस्टाईन अॅथॉरिटीचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यावर सध्या अमेरिकाचा मोठा दबाव आहे. हमास आणि इस्रायल यांच्या शस्त्रसंधीनंतर गाझावरही पॅलेस्टाईन अॅथॉरिटीचे नियंत्रण असले पाहिजे, अशी अमेरिकेची भूमिका आहे.
हेही वाचा