Mohammad Hasnain : पाकिस्तानच्या संघात आफ्रिदीच्या जागी ‘या’ वादग्रस्त बॉलरची एन्ट्री!

Mohammad Hasnain : पाकिस्तानच्या संघात आफ्रिदीच्या जागी ‘या’ वादग्रस्त बॉलरची एन्ट्री!

पुढारी ऑनलाईन डेस्क : या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. पण त्याला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला (Shaheen Afridi) दुखापत झाली आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. आता त्याच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) 22 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनचा (Mohammad Hasnain) संघात समावेश केला आहे. हसनैनने पाकिस्तानसाठी 18 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर 17 विकेट्स आहेत.

हसनैन (Mohammad Hasnain) सध्या इंग्लंडमध्ये 'द हंड्रेड' स्पर्धा खेळत आहे, तेथून तो आशिया कपसाठी थेट यूएईला पोहोचेल आणि पाकिस्तान संघात सामील होईल. त्याच्या व्यतिरिक्त नसीम शाह, शाहनवाज डहानी, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि हारिस रौफ हे आता पाकिस्तानी संघात वेगवान गोलंदाज आहेत.

आशिया चषकाचा पहिला सामना 27 ऑगस्टला होणार आहे. यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतील. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. शाहीनच्या अनुपस्थितीत भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हसनैनलाही (Mohammad Hasnain) संधी मिळण्याची शक्यता आहे.

हसनैनबद्दल असे बोलले जात आहे की तो शाहीन आफ्रिदीपेक्षाही धोकादायक सिद्ध होऊ शकतो. त्याच्याकडे आफ्रिदीप्रमाणेच चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याचे कौशल्य आहे. हसनैनने टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत 82 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 100 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त, तो क्वेटा ग्लॅडिएटर्स, सिडनी थंडर, ओव्हल इनव्हिजिबल आणि ट्रिनबॅगो नाइट रायडर्सकडूनही खेळला आहे.

स्टॉइनिसने हसनैनच्या बॉलिंग अ‍ॅक्शनवर प्रश्न उपस्थित केले होते

हसनैनची (Mohammad Hasnain) बॉलिंग अॅक्शन नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. अलीकडेच 'द हंड्रेड' स्पर्धेत खेळताना ऑस्ट्रेलियन स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने बाद झाल्यानंतर हसनैनच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. स्टॉइनिसने इशारा करून चकिंग केल्याचे संकेत दिले होते. हसनैन द हंड्रेड स्पर्धेत ओव्हल इन्विंसिबल संघाकडून खेळत आहे.

शोएब अख्तरने दिले स्टॉइनिसला प्रत्युत्तर

हसनैनच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर भडकला होता. स्टॉइनिसची हिम्मत कशी झाली, असा ट्विटद्वारे इशारा देत हे लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. अख्तर म्हणाला होता की, 'तुझी अशी हिंमत कशी झाली? याप्रकरणी आयसीसीने मौन बाळगले आहे. एखाद्या गोलंदाजाला त्याच्या बॉलिंग ॲक़्शनबद्दल परवानगी मिळाली असेल, तर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस कोणत्याही खेळाडूने करू नये.'

हसनैन गोलंदाजी प्रकरणी निलंबित झाला होता…

वास्तविक, बिग बॅश लीग (BBL) दरम्यान मोहम्मद हसनैनची गोलंदाजीची ॲक़्शन संशयास्पद आढळली होती. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) दरम्यान हसनैनच्या ॲक़्शनची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याला गोलंदाजीपासून निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हसनैनने आपल्या ॲक़्शनमध्ये सुधारणा केली. त्यानंतर त्याला आयसीसीकडून गोलंदाजीसाठी परवानगी दिली.

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ…

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर आणि मोहम्मद हसनैन.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news