Shubman Gill : शुभमन गिलने मोडला सचिन तेंडूलकरचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम, रोहित-राहुलच्या स्पेशल क्लबमध्ये सामील | पुढारी

Shubman Gill : शुभमन गिलने मोडला सचिन तेंडूलकरचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम, रोहित-राहुलच्या स्पेशल क्लबमध्ये सामील

पुढारी ऑनलाईन डेस्क : झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) धमाकेदार खेळी केली. त्याने शानदार शतक झळकावत नव्या विक्रमाला गवसणी घातली. हरारे क्लब मैदानावर त्याने 1 षटकार 15 चौकारांच्या जोरावर 97 चेंडूत 130 धावांची शानदार खेळी खेळली. गिलचा स्ट्राइक रेट 134.02 होता. त्याने शतक झळकावून सचिन तेंडुलकरचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला. शुभमनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे.

झिम्बाब्वेमध्ये वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी खेळणारा शुभमन (Shubman Gill) हा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा विक्रम यापूर्वी तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 1998 मध्ये बुलावायो येथे नाबाद 127 धावा केल्या होत्या. शुबमनचे याआधी कसोटीत चार अर्धशतके आणि एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतके झळकावली आहेत.

शतक झळकावल्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे. गिलच्या आधी रोहित आणि राहुलनेही झिम्बाब्वेमध्ये कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. रोहितने 2010 मध्ये आणि राहुलने 2016 मध्ये ही कामगिरी केली होती.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत गिलने तिसऱ्या क्रमांकावर शानदार फलंदाजी केली. सुरुवातीला त्याने संयमी खेळाचे प्रदर्शन केले. त्यानंतर त्याने आपल्या खेळाचा वेग वाढवत मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. भारताच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि धवनने चांगली सुरुवात केल्यानंतर विकेट गमावल्या. राहुल 30 आणि धवन 40 धावा करून बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतर इशान किशनने गिलच्या साथीने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली.

ईशानने 61 चेंडूत 50 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर एकही फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. गिल एका टोकाला टीकून राहिला. पण दुसऱ्या टोकाला फलंदाज बाद होत राहिले. संजू सॅमसन 15, शार्दुल ठाकूर नऊ, दीपक हुड्डा एक आणि अक्षर पटेल एक धाव काढून बाद झाले. कुलदीप यादव दोन आणि दीपक चहर एक धावा काढून नाबाद राहिले. भारताने 50 षटकांत 8 बाद 289 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने सर्वाधिक 5 बळी घेतले.

Back to top button