Jaiswal vs Bumrah : द्विशतकवीर यशस्वी जैस्वाल ऐवजी बुमराहला का दिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार?

Jaiswal vs Bumrah : द्विशतकवीर यशस्वी जैस्वाल ऐवजी बुमराहला का दिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jaiswal vs Bumrah : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाचा 106 धावांनी पराभव केला. या विजयासह यजमान भारताने पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. या विजयात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

यशस्वी जैस्वालने भारताच्या पहिल्या डावात 209 धावांची शानदार खेळी केली. या धदाकेबाज द्विशतकाच्या जोरावर टीम इंडिया 396 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी झाली. त्यानंतर बुमराहने इंग्लंडचा पहिला डाव उध्वस्त केला आणि 6 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ज्यामुळे भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. दुस-या डावात भारताने शुबमन गिलच्या संयमी शतकाच्या जोरावर इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष दिले. धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडकडे तब्बल दोन दिवस होते. त्यांनी सुरुवातही चांगली केली. पण सामन्याच्या चौथ्या दिवशीच भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश संघाला लोटांगण घालण्यास भाग पाडले. बुमराहने अशा वेळी भारतासाठी विकेट घेतल्या जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. त्याने आणि अश्विनने 3-3 बळी मिळवले. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सामन्याचा निकाल लागल्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कारावर कोण मोहोर उमटवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. द्विशतकवीर यशस्वी जैस्वाल आणि संपूर्ण सामन्यात 9 विकेट घेणारा बुमराह यांच्यात शर्यत रंगली होती. पण पॅनलने दोन्ही डावातील कामगिरीची दखल घेऊन या पुरस्कारासाठी बुमराहची निवड केली. बुमराहने या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. दुसरीकडे जैस्वाल दुसऱ्या डावात अपयशी ठरला होता, ज्यामुळे तो 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराच्या शर्यतीत मागे पडला.

बुमराहने पहिल्या डावात ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांच्या मोठ्या विकेट्स घेत टॉम हार्टली आणि जेम्स अँडरसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. दुसऱ्या डावात त्याने जॉनी बेअरस्टो, बेन फॉक्स आणि टॉम हार्टली यांना बाद केले.

पुरस्कार घेतल्यानंतर बुमराह म्हणाला, 'मी आकड्यांकडे पाहत नाही. जर तुम्ही आकड्यांचा विचार केला तर खूप दडपण असते. भारतीय संघ आज जिंकला आहे. या विजयात मला योगदान देता आले याचा खूप आनंद आहे. यॉर्करवर घेतलेली पोपची विकेट ही एक अविस्मरणीय विकेट आहे. तो यॉर्कर मी टेनिस-बॉल क्रिकेटमध्ये शिकलेला पहिला चेंडू होता. मला वाटले की विकेट घेण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news