R Ashwin Record : आर अश्विनचा नवा विक्रम! बनला ‘टॉप विकेट टेकर’ भारतीय गोलंदाज | पुढारी

R Ashwin Record : आर अश्विनचा नवा विक्रम! बनला ‘टॉप विकेट टेकर’ भारतीय गोलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Record : भारताचा धडाकेबाज फिरकी गोलंदाज आर अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत शानदार गोलंदाजी केली. यासह त्याने आणखी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला असून त्याने माजी फिरकीपटू बीएस चंद्रशेखर यांना मागे टाकले आहे. अश्विनने केवळ 21 कसोटीत आतापर्यंत 97 बळी मिळवण्याची किमया केली आहे. तर यापूर्वी चंद्रशेखर यांच्या नावावर 23 कसोटीत 95 विकेट्स होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर माजी दिग्गज अनिल कुंबळे (92 विकेट्स) आहे.

विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात अश्विनला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, त्याने दुसऱ्या डावात इंग्लिश संघाला अडचणीत आणले. त्याने रविवारी सलामीवीर बेन डकेटला पायचित पकडले. डकेटने 27 चेंडूत 6 चौकारांसह 28 धावा केल्या. त्याने जॅक क्रॉली (73) सोबत पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. ऑली पोप अश्विनचा दुसरा बळी ठरला. सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी 21 चेंडूत 23 धावा जोडल्यानंतर तो रोहित शर्माकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर अश्विनने जो रुटला (10 चेंडूत 16) अक्षर पटेलकरवी झेलबाद केले.

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी बळी घेणारे भारतीय गोलंदाज

96 : आर अश्विन
95 : बी.एस.चंद्रशेखर
92 : अनिल कुंबळे
85 : बिशन सिंग बेदी
85 : कपिल देव
67 : इशांत शर्मा

399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था लंच ब्रेकपर्यंत बिकट झाली. पहिल्या सत्राअखेर इंग्लंडची धावसंख्या 42.4 षटकांत 6 बाद 194 अशी होती. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अश्विनने तीन-तीन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अश्विन 500 कसोटी बळींच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात 499 विकेट्स जमा झाल्या आहेत. पुढील कसोटीत एक बळी मिळवताच तो अनिल कुंबळेनंतर भारतासाठी 500 बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरेल.

Back to top button