WTC Points Table : डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाची मोठी झेप, ‘टॉप’ला येण्यासाठी एका विजयाची गरज | पुढारी

WTC Points Table : डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाची मोठी झेप, ‘टॉप’ला येण्यासाठी एका विजयाची गरज

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Points Table : विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. या विजयानंतर भारताने गुणतालिकेत मोठी झेप घेत दुसरे स्थान मिळवले आहे. या बदलामुळे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांची घसरण झाली आहे. हैदराबाद कसोटी गमावल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहचली होती, पण विशाखापट्टणममध्ये मैदान मारल्यानंतर रोहित सेनेने पुन्हा गुणतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याची संधी

भारताने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांपैकी 3 जिंकले आहेत, तर 2 गमावले आहेत. 1 कसोटी अनिर्णित राहिली आहे. यासह टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 52.77 झाली आहे. तर खात्यात 38 गुण जमा झाले आहेत. दुसरीकडे विजयाची टक्केवारी 55 असल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे. कांगारूंनी आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 जिंकले असून 3 गमावले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला आहे. दरम्यान, टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध अजून 3 कसोटी सामने खेळायचे आहेत. मालिकेतील तिसरी कसोटी राजकोट येथे खेळवली जाणार आहे. या सामन्यात रोहित सेनेने विजय मिळवल्यास संघाचे सात सामन्यांतून 50 गुण होतील. तर विजयाची टक्केवारी 59.52 असेल. ज्यामुळे टीम इंडिया पहिले स्थान गाठू शकेल.

इंग्लंडचे नुकसान नाही, पण…

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला डब्ल्यूटीसी पॉईंट टेबलच्या स्थानामध्ये कोणतेही नुकसान झाले नाही, पण त्यांच्या विजयाच्या टक्केवारीत घट झाली आहे. इंग्लंडचा संघ 8व्या क्रमांकावर असला तरी आता त्यांची विजयाची टक्केवारी केवळ 25 झाली आहे.

Back to top button