पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मालिकेतील पहिला कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. 'बीसीसीआय'ने भारताला वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला भारतीय संघातून बाहेर पडण्याची संधी दिली आहे. (IND vs AUS 2nd Test) मात्र, त्याच्या जागी अन्य खेळाडूचा समावेश भारतीय संघात करण्यात आलेला नाही.
सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्य रणजी ट्रॉफी खेळल्या जात आहेत. सौराष्ट्रचा संघ अंतिम सामन्यात पोहचला आहे. जयदेव उनाडकट हा सौराष्ट्र संघाचा कर्णधारही आहे. त्यामुळे बीसीसीआयने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी त्याला संघातून बाहेर जाण्याची संधी दिली आहे. जेणेकरून उनाडकटला सौराष्ट्रच्या संघाचे अंतिम सामन्यात नेतृत्व करता येईल. रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना सौराष्ट्र विरुद्ध बंगाल असा रंगणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जयदेव उनाडकटचा भारतीय संघात समावेश होता. मात्र, तो दुसरा सामना खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ २ वेगवान गोलंदाज आणि ३ फिरकीपटूंना मैदानात उतरवू शकतो. त्यामुळे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला दुसऱ्या सामन्यातही संधी मिळू शकते. तिसरा वेगवान गोलंदाज भारतीय संघाकडे उमेश यादवचा पर्याय आहे. त्यामुळे जयदेव उनाडकटला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी संघातून बाहेर पडण्याची संधी देण्यात आली आहे. (IND vs AUS 2nd Test)