पुढारी ऑनलाईन डेस्क : फिरकीपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दिमाखदार विजय मिळवला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे कर्णधार रोहित शर्मासह संघातील सर्वच खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. पहिली कसोटीत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. मात्र या गोलंदाजांना संभाळताना कशी कसरत होते, याची माहिती भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने एका मुलाखतीत दिली. रोहित नेमकं काय म्हणाला, हे जाणून घेवूया. ( Rohit Sharma on India bowlers )
नागपूर कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने इरफान पठाणशी संवाद साधला. यावेळी त्याने भारतीय गोलंदाजांबाबत संभाळणे किती कठीण आहे हे आपल्या विनोदीशैलीत सांगितले.
रोहित शर्मा म्हणाला की, मला गोलंदाजांच्या किंवा क्रिकेटमधील विक्रमांबद्दल फारशी माहिती नसते. संघातील गोलंदाज माझ्याकडे येतात मला म्हणतात, मी २५० विकेटच्या जवळ आहे, मित्रा मला बॉलिंग दे. तर एकजण म्हणतो, असे मी तर ४५० विकेट घेण्याच्या खूपच जवळ आहे बॉलिंग मीच करणार तर एकजण म्हणतो, अरे मी ४ विकेट घेतल्या आहेत मला आणखी एक विकेट घेवून ५ विकेट पूर्ण करायच्या आहेत, मलाच गोलंदाजी दे. त्यांच्या या मागणीमुळे खरंच भारतीय गोलंदाजांना रोखणे कठीण होते, अशी प्रेमळ तक्रारही रोहितने या वेळी केली.
या वेळी रोहित शर्माने सांगितले की, "टीम इंडियामध्ये मोहम्मद सिराजला संभाळणे सर्वात कठीण आहे. आम्ही त्रिवेंद्रम येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेला २२ षटकांमध्ये ऑलआउट केले होते. या सामन्यात सिराजने ४ बळी घेतले. या २२ षटकांमधील १० षटके ही सिराजनेच टाकली होती. त्याला या सामन्यात आपल्या नावावर पाच बळी हवे होते. त्यामुळे तो थांबायचे नावच घेत नव्हता. अखेर मी त्याला समजावले की, पुढे कसोटी मालिका आहे त्यावेळी गोलंदाजी कर. यानंतर त्याने गोलंदाजी मागण्याचा हट्ट थांबवला, असेही रोहितने यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :