Goa Tourism : गोव्यात देशी पर्यटकांच्या संख्येत वाढ : ख्रिसमस, नववर्षानिमित्त हॉटेल्स बुकिंगची लगबग

Goa Tourism : गोव्यात देशी पर्यटकांच्या संख्येत वाढ : ख्रिसमस, नववर्षानिमित्त हॉटेल्स बुकिंगची लगबग


पणजी: गोवा हे जागतिक पर्यटनाचे केंद्र असल्याने वर्षाला 40 लाखापेक्षा जास्त पर्यटक गोव्यात येतात. डिसेंबर महिना वर्षातील जास्त पर्यटकांची गर्दी असणारा महिना असतो. सध्या गोव्यात देशी-विदेशी पर्यटक दिसत आहेत. मात्र, अजून म्हणावी तशी मोठी गर्दी झालेली नाही. डिसेंबर महिन्यात ख्रिसमस व नववर्ष हे दोन मोठे इव्हेंट गोव्यात साजरे करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची गोव्यात गर्दी वाढते. Goa Tourism

डिसेंबर महिना सुरू झाला असल्यामुळे सर्वत्र पर्यटकांचे लोंढे दिसतात. विदेशी पर्यटकांची पसंती समुद्र किनार्‍यांना असते. संध्याकाळच्यावेळी तर समुद्र किनारी मोठी गर्दी दिसते. गोव्यात पर्यटकांना सुरक्षित वाटत असल्याने आणि सरकारनेही पर्यटकांसाठी अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्याने गोवा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. Goa Tourism

ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात समुद्र किनार्‍यांवर 50 ते 60 हजार बेड सध्या आहेत. त्याचबरोबर खासगी गेस्ट हाऊस आहेत. 15 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळात गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता असून या काळात राज्यातील बहुतांश हॉटेल्सच्या खोल्या बुकिंग झालेल्या आहेत. या वीस दिवसांतच पाच लाखांहून अधिक पर्यटक गोव्यात येण्याची शक्यता आहे. आठवड्याभरात विदेशातून 12 चार्टर विमाने गोव्यात येणार आहेत.

Goa Tourism : किनारी भागात वाहनांची गर्दी

देशी पर्यटक गोव्यात येताना स्वतःची वाहने घेऊन येत असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस किनारी भागात वाहनांची गर्दी वाढत आहे. वाहतूक पोलिस अनेक ठिकाणी तैनात असले तरी वारंवार वाहतूक कोंडी होताना दिसते.

रशियन पर्यटकांना विदेशात जाण्यास बंदी

रशियन सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव रशियन्स नागरिकांवर परदेशात जाण्यावर निर्बंध आणले आहेत. या निर्बंधाचा मोठा परिणाम गोव्यावर होण्याची शक्यता आहे. कारण पर्यटन हंगामात गोव्यात दर आठवड्याला 6 चार्टर विमाने रशियातून येतात. येत्या आठवड्यातही ती येणार आहेत. मात्र या बंदीमुळे ती येतील की नाही याबाबत शंका आहे. रशियन नागरिक पर्यटनाठी भारतात विशेषतः गोव्यात येणे पसंत करतात. शिवाय ते मनसोक्त पैसा खर्च करत असल्याने पर्यटन महसूल वाढण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

रशियन पर्यटकांची गोव्याला अधिक पसंती…

उपलब्ध माहितीनुसार, 2017 मध्ये गोव्यातील 8.9 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमनांपैकी 58 टक्के म्हणजेच 4.9 लाख रशियन पर्यटक होते. मात्र मागील वर्षी राज्यात आलेल्या 1.69 लाख परदेशींपैकी 7.41 टक्के म्हणजे 12, 626 पर्यटक हे रशियन्स होते. रशियामध्ये 11 डिसेंबरपासून पर्यटनासाठी नवीन नियम लागू झाले आहेत. नागरिकांना देश सोडण्यास मनाई आहे, त्यांना त्यांचे परदेशी पासपोर्ट जमा करणे बंधनकारक आहे. नीलेश शहा यांनी येत्या आठवड्यात रशियातून सहा विमाने येणार असल्याचे सांगितले. नव्या आदेशाबाबत अद्याप कल्पना नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news