गोवा : सुमारे 87 टक्के गोमंतकीय मासे खाणारे

गोवा : सुमारे 87 टक्के गोमंतकीय मासे खाणारे

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्याच्या 15 लाख लोकसंख्येपैकी तब्बल 13 लाख (सुमारे 87 टक्के) लोक मासे खातात. गोवेकर मासे प्रिय समजले जातात. शितकडी व तळलेल्या माशांशिवाय गोवेकरांच्या घशात जेवण जात नाही, असे अनेकदा म्हटले जाते. मात्र, असे असतानाही लक्षद्वीप बेटाने मात्र मासे खाण्याबाबत गोव्याला मागे टाकले आहे.

केंद्रीय मत्स्योद्योग खात्याने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालानुसार, मासे खाण्यात गोवा देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर लक्षद्वीप बेट पहिल्या क्रमाकांवर आहेत. गोव्यात वर्षाला प्रत्येक व्यक्ती सरासरी 78 किलो, तर लक्षद्वीप बेटावरील प्रत्येक व्यक्ती वर्षाला सुमारे 125 किलो मासळी खाते.

सुमारे 13 लाख गोवेकर मासळी खातात. ते वर्षाला 78 किलो मासे खातात म्हणजेच महिन्याला साडेसहा किलो व दिवसाला सुमारे 216 ग्रॅम मासळी खातात. गोवा हे किनारी राज्य आहे, तर लक्षद्वीप बेट समुद्रात आहे. गोव्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. तेथे वर्षाला प्रति व्यक्ती सुमारे 77.84 किलो मासळी खाते.

देशभरात किनारी प्रदेश अग्रेसर

सन 2020-21च्या अहवालानुसार संपूर्ण देशासाठी हे प्रमाण प्रति व्यक्ती 6.31 किलो इतके आहे. मासे खाण्याच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी त्रिपुरा आहे. येथे वर्षाला प्रति व्यक्ती 25.53 किलो मासळी खाल्ली जाते. त्यानंतर इतर राज्ये आहेत. मात्र राष्ट्रीय अहवालानुसार मासे खाण्यात किनारी राज्ये व बेटांचाच अग्रक्रम दिसून येतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news