घरगुती वीज वापरात गोवा देशात अव्वल | पुढारी

घरगुती वीज वापरात गोवा देशात अव्वल

प्रभाकर धुरी

पणजी :  घरगुती वीज वापरात गोवा राज्य देशात अव्वल आहे. गोव्यात साधारणपणे एका महिन्यात सरासरी 263 किलोवॅट प्रतितास वीज वापरली जाते. सर्वांत कमी वीज वापर असलेल्या आसाममधील सरासरी घरगुती वापराच्या पाचपट हा वीज वापर आहे. आसाम हे देशातील सर्वांत कमी घरगुती वीज वापरणारे राज्य आहे. दरम्यान, 2012-2022 या दहा वर्षांच्या काळात भारताचा एकूण देशांतर्गत ऊर्जेचा वापर 171 अब्ज युनिटस्वरून 340 अब्ज युनिटपर्यंत वाढला आहे. ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक हितसंबंधित संशोधन करणार्‍या पुणेस्थित ‘प्रयास’ या अशासकीय संस्थेच्या अहवालातून हे उघड झाले आहे. ही संस्था ‘ना नफा’ तत्वावर लोकांच्या अभिरुची लक्षात घेऊन विजेच्या क्षेत्रात काम करते. औद्योगिक आणि घरगुती क्षेत्र देशातील विजेच्या वापरातील वाढीचे मुख्य घटक आहेत. देशभरातील विजेचा वापर कसा केला, याचा ही संस्था अभ्यास करते आणि अहवाल देते.

2012-2022 दरम्यान भारताचा एकूण देशांतर्गत ऊर्जेचा वापर 171 अब्ज युनिट्सवरून 340 अब्ज युनिट्सपर्यंत वाढला आहे. अतिरिक्त मागणीमध्ये उत्तर प्रदेश, तमिळनाडू, बिहार, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा वाटा जवळपास 50 टक्के होता.

ऊर्जा संशोधनातील विश्लेषण

2012 ते 2022 पर्यंत देशांतर्गत वीज वापराने वार्षिक 7.1 टक्के वाढीचा सर्वोच्च दर पाहिला, तर 2012-22 दशकात निर्माण झालेल्या एकूण अतिरिक्त मागणीचा सर्वांत मोठा भाग हा उद्योग आहे. 2012-2022 या कालावधीत 32 टक्के घरगुती वापरकर्त्यांसह औद्योगिक क्षेत्राचा वाटा 39 टक्के होता आणि कृषी वापराचा वाटा 2012-2022 दरम्यान अतिरिक्त मागणीच्या 16 टक्के होता. औद्योगिक वीज वापर करणारी देशातील मुख्य 5 राज्ये – अनुक्रमे गुजरात, ओडिशा, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि छत्तीसगड ही आहेत. त्यांनी 2022 मध्ये या क्षेत्राद्वारे वापरल्या जाणार्‍या एकूण विजेच्या 50 टक्केपेक्षा जास्त वीज या राज्यांनी वापरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button