पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गोवा दौर्‍यावर | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गोवा दौर्‍यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. 26) महाराष्ट्र आणि गोवा दौर्‍यावर आहेत. महाराष्ट्र दौर्‍यात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उद्घाटन होईल; तर गोवा येथे 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना उद्यापासून सुरुवात होत आहे. या स्पर्धांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील.

पंतप्रधान कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दुपारी एकच्या सुमारास शिर्डी येथील साईबाबा मंदिरात पूजा होईल. तसेच मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करण्यात येईल. दुपारी दोनला निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण होईल. दुपारी सव्वातीनला पंतप्रधान मोदी शिर्डी येथे जाहीर सभेत सहभागी होणार आहेत.

‘या’ कामांचे उद्घाटन

नमो शेतकरी महासन्मान
निधी योजनेचे उद्घाटन.
अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन.
माता आणि बालआरोग्य विभागाची पायाभरणी.
लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डाचे वाटप.
कुर्डुवाडी-लातूर मार्ग या 186 किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण.
जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग
राष्ट्रीय महामार्ग 166 च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण.

Back to top button