आगामी नाशिक महापालिका निवडणूकीत ‘वंचित’ला मिळाव्यात 50 जागा : अविनाश शिंदे

अविनाश शिंदे www.pudhari.news
अविनाश शिंदे www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

आगामी महापालिका निवडणूक म्हणजे वंचित बहुजन आघाडीसाठी एकप्रकारे सत्त्वपरीक्षाच आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर युतीची घोषणा झालेली असल्याने वंचित बहुजन आघाडीला नाशकात किमान 50 जागा सुटल्या पाहिजेत अशी आमची आग्रही मागणी राहील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीने नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी  सातत्याने दौरे केल्यामुळे नाशकात या पक्षाचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य वाढले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच इतर अनेक पक्षांचे मान्यवर नेते आणि कार्यकर्तेही पक्षाशी संपर्क साधून असून त्यांनाही तिकिटाची मोठी आस लागून राहिली आहे. याक्षणी निवडणुका लागल्या तरी सर्व 122 जागांवर भक्कम उमेदवार आम्ही उभे करू शकतो, इतकी आमची ताकद निर्माण झाली आहे आणि ते त्रिकालाबाधित सत्य आहे. तसेच युतीबाबत बोलणी झाल्यानुसार आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा भाऊ मानतो आणि  50 जागांवर आम्ही त्यांच्याकडे दावा करणार आहोत. उर्वरित 72 जागा त्यांनी घ्याव्यात असे आमचे म्हणणे आहे. युतीचे जागावाटप असे झाले तर शिवशक्ती आणि भीमशक्तीला कोणी रोखू शकणार नाही व नाशिक महानगरपालिकेवर उभय पक्षांचा संयुक्त झेंडा निश्चितच फडकेल असा विश्वास वाटतो. युतीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांबरोबर याआधी प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली आहे. आता लवकरच आणखी महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी आम्ही जागा वाटपाबाबत आमचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडू असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news