पर्वती बनली धोकादायक ! खडक होतोय जीर्ण-शीर्ण; डोंगर घुशींनी पोखरला

पर्वती बनली धोकादायक ! खडक होतोय जीर्ण-शीर्ण; डोंगर घुशींनी पोखरला
Published on
Updated on

पुणे : शहराच्या मध्यभागी समुद्रसपाटीपासून 650 मीटर उंचीवर असलेल्या पर्वतीचा डोंगर धोकादायक बनला आहे. हा डोंगर मागच्या बाजूने घुशींनी पोखरल्याने भुसभुशीत झाला असून, मोठा पाऊस झाला, तर तिच्या कुशीत असलेल्या वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. 'टीम पुढारी'ने पर्वतीची चारही बाजूंनी बारकाईने पाहणी केली, तसेच याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांकडे विचारणा केली असता, त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला, तसेच तेथील खडकांची झीज का होत आहे, दगडाचा प्रकार कोणता, याबाबत शास्त्रीय माहितीदेखील दिली.
पर्वतीचे वय सुमारे 250 वर्षे असून, चारही बाजूंनी अतिक्रमणांनी वेढली आहे. यात मात्र टेकडीखाली राहणार्‍या लोकांना याची काहीही कल्पना नाही. या टेकडीची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पर्वतीचा डोंगर रेड सॅन्ड सॉईलचा..
पर्वतीसमोरून सशक्त दिसते. मात्र, दक्षिण बाजू खूप खचली आहे. तेथील जमिनीचा पोत खराब झाल्याने माती मोठ्या प्रमाणावर पावसाने वाहून जात आहे. तज्ज्ञांच्या मते हा डोंगर रेड सॅन्ड सॉईल अर्थात लाल मातीचा आहे. भूगर्भाशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास तो स्पर झोनमध्ये येतो. ही माती चिवट नसते. त्यामुळे झाडे जास्त खोलवर न जाता तग धरून राहत नाहीत. मुरूम असल्याने पावसाचे पाणी वेगाने खाली येत आहे.

दक्षिण बाजूकडे कुणाचे लक्ष नाही…
पर्वतीवर महादेव मंदिराकडे जाताना पायर्‍या संपल्यावर एक कॅन्टीन आहे. तेथील मोठी भिंत खचली आहे. तो अख्खा भाग खाली येऊ शकतो. त्याच्याच बाजूला दक्षिण दिशेला पेशवेकालीन पिंपळाचा पार असून, ती पूर्ण कडा भुसभुशीत झाली असून, कधीही खाली येईल, अशा अवस्थेत आहे. तेथे अनेक मोठी झाडे उन्मळून पडलेली आहेत. मातीचा भराव खाली आला आहे.

विष्णू मंदिराजवळचे मचाण ढासळण्याच्या स्थितीत
डोंगराच्या उत्तरेला महादेव मंदिर आहे. ती बाजू बर्‍यापैकी मजबूत आहे. मात्र, दक्षिण दिशेला विष्णू मंदिर आहे. त्या समोर सध्या नूतनीकरण केलेल्या जागेच्या पुढ्यात जमिनीपासून किमान 60 ते 70 मीटर उंचीवर दगडी मचाण आहे. तेथे जाण्यास सध्या मज्जाव आहे. सुरक्षारक्षक तेथे जाऊ देत नाहीत. मात्र, आतल्या बाजूने या मचाणावरची माती पावसामुळे सतत खाली येत आहे. जोराचा पाऊस आला तर ही बाजू कधीही ढासळू शकेल, अशी स्थिती आहे.

मागची बाजू बनली कचर्‍याचे आगार
मागच्या बाजूने फार कमी लोक पर्वतीवर जातात. त्याच बाजूने म्हाडा कॉलनी आहे. या बाजूने विष्णू मंदिरापर्यंत वाहनाने वर जाता येते. मात्र, हा रस्ता कचर्‍याचे आगार बनला आहे. तेथे महापालिकेचे कचरा संकलन केंद्र आहे. मात्र, तेथे नीट काम होत नाही. त्यामुळे या भागात घुशींचे साम्राज्य आहे. तेथे घुशींनी डोंगर पोखरला आहे. त्या भागातून जाताना नाक दाबून जावे लागते इतकी कचर्‍याची दुर्गंधी येते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news