सांगली : शेटफळे ग्रामस्थांची विधवा प्रथेला मूठमाती; ४० महिलांना मिळाले सौभाग्याचं लेणं

सांगली : शेटफळे ग्रामस्थांची विधवा प्रथेला मूठमाती; ४० महिलांना मिळाले सौभाग्याचं लेणं
Published on
Updated on

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे विधवा प्रथेला मूठमाती देण्यात आली. ग्रामपंचायत, बचतगट आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून ही अनिष्ट प्रथा बंद करण्यात आली. विधवा महिलाची खणा-नारळाने ओटी भरून हळदी- कुंकवाचा सोहळा पार मोठ्या उत्साहात साजरा केला. हेटाळणी होणाऱ्या महिलांना सन्मान मिळाल्याने ओटी भरलेल्या विधवा महिलांचे डोळे पाणावले.

शेटफळे हे विधवांची ओटी भरणारे आणि हळदी- कुंकवाचा मान परत देणारे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. विधवा प्रथा बंदीचा शासनाने कायदा केला आहे. शेटफळे ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत आणि ग्रामसभेत याबाबत ठराव घेतला. विधवा महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा लतादेवी बोराडे यांची ज्येष्ठासोबत बैठक घेत आणि ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रबोधन केले. बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राथमिक व माध्यमिक शिक्षिका यांना सोबत घेऊन गावात सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यात आली.

विधवा महिला अनिष्ट प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याची मोहीम गावातील सर्व घरात पोहचली. संपूर्ण गावातूनच अनिष्ट विधवा प्रथेला कायमचे हद्दपार करण्याचा संकल्प केला. विधवा विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा लतादेवी बोराडे आणि सुवर्णा पाटील यांच्या उपस्थितीत ग. दी. माडगूळकर स्मारकामध्ये विधवांची ओटी भरत हळदी- कुंकवाचा मान आणि सौभाग्याचे लेणे सन्मानाने देण्यात आले. सरपंच सुप्रिया गायकवाड, उपसरपंच विजय देवकर उपस्थित होते. लतादेवी बोराडे, सुवर्णा पाटील, एस. एस. गायकवाड आणि प्रा. सी. पी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात गावातील चाळीस विधवा महिलांची ओटी भरून त्यांना हळदी- कुंकू लावले. यासाठी गावातील दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. यावेळी विधवा प्रथा कायमची बंद करण्याची महिलांनी शपथ घेतली. विधवा शब्दाऐवजी सक्षम महिला शब्द वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news