

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक शुक्रवारी दुपारी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. त्यामुळे १०० टक्के भरलेल्या नाथसागर धरणातून गोदावरी नदीत ४७ हजार १६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
शुक्रवारी दि. १४ रोजी दुपारी एक वाजल्यानंतर नाथसागर धरणाच्या वरील भागातून पाण्याची आवक वाढत गेली. त्यामुळे येथील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी २७ पैकी अडीच फूट १८ दरवाजातून गोदावरी नदीत ४७ हजार १६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला.
अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणामधून नाथसागर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे सायंकाळी काही प्रमाणावर गोदावरीत विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व शाखा अभियंता विजय काकडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.