पुणे : पुढारी वृत्तसेवा
पोलिसांचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासाठी टीका केली जात आहे. खोटे आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून आरोप करावेत. रघुनाथ कुचिक प्रकरणात चार दिवसांत 'दुध का दुध आणि पानी का पानी' समोर येईल, असे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नाव न घेता टोला लगावला.
आयुक्तालयाला भेट देऊन चाकणकर यांनी पुणे शहरातील अत्याचाराच्या घटनांचा आणि पुणे पोलिसांच्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित मुलीचे अपहरण पोलिसांनीच केल्याच्या आरोपावर चाकणकर म्हणाल्या, या संदर्भात पीडित मुलीने शनिवारी रात्री दीड वाजता महिला आयोगाला तक्रार केली होती. परंत, रविवारी प्रशासकीय सुटी असल्याने कार्यालय बंद होते. त्यामुळ सोमवारी सकाळी तिचा इमेल आम्हाला मिळाला. तिने केलेल्या मागणीचा अर्ज पुणे पोलिसांना पाठविला आहे. तिने संपूर्ण मेडीकल तपासणीची मागणी केली आहे, तिची तपासणी केली जावी यासाठी पोलिसांना सकाळी लवकरच पत्र पाठविले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने राज्य महिला आयोगाला ई-मेल केला आहे. त्यामध्ये त्यांच्या मुलीने महिला आयोगाकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. रघुनाथ कुचिक न्यायालयाच्या आदेशानुसार जामीनावर मुक्त आहेत. त्या प्रकरणाचा तपास देखील सुरू आहे. असे असताना भाजप नेत्या चित्रा वाघ खोटी माहिती माध्यमांमध्ये पसरवित आहेत. कुचिक यांच्या विषयी अपमानजनक टीका करत आहेत. त्यामुळे कुंटुंबियांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहचला आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
अशा पध्दतीने टीका होत असताना संबंधीत फिर्यादी आणि चित्रा वाघ या संगनमताने प्रकरणाची मिडीया ट्रायल चालवत आहेत. त्यामुळे संबंधित महिला आणि चित्रा वाघ यांच्या संगनमताची चौकशी व्हावी व त्यांची नार्को चाचणी करावी अशी तक्रार कुचिक यांच्या मुलीने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी करावी व चौकशी नंतरचा अहवाल माहिला आयोगाला पाठवावा असे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
शहरातून मुली बेपत्ता होत आहेत, त्याबद्दल बोलताना चाकणकर यांनी सांगितले, काही बेपत्ता प्रकरणे ही बालविवाहाशी संबंधीत आहेत. अशा घटना होऊ नयेत, यासाठी पुणे पोलिसांकडूनही काम केले जात आहे. त्यामध्ये बडीकॉप, पोलिसांचे 457 वॉटस ग्रुप आहेत. त्यामध्ये 36 हजार 436 नागरिक पोलिसांशी जोडले गेले आहेत. घटना घडू नये म्हणून पोलिस काका पोलिस दिदीच्या माध्यमातून पोलिसांचे शाळेच्या परिसरात लक्ष असते. अशा घटना घडू नये यासाठी मुलींनीही शैक्षणिक आयुष्य पुर्ण करावे, खोट्या भुलथापांना बळी पडू नये, आपल्या पालकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असे अवाहन चाकणकर यांनी मुलींना केले. पोलिस काका, पोलिस दिदी, भरोसा सेल, दामिनी पथक, मायसेफ पुणेचे ॲपच्या माध्यमातून पुणे पोलिस काम करत आहे. त्यांचा कामाचे कौतुक चाकणकर यांनी केले. महाराष्ट्र पोलिसांना विरोधकांकडून बदनाम करण्याचे काम सुरू आहे. काहींनी तर त्याचा विडा उचलल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मागील सरकारच्या काळात प्रज्वला योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या प्रश्नावर आमदार मनिषा कायंदे यांनी विधान सभेत बाजू मांडली. त्यासाठी समिती नेमण्याचीही मागणी त्यांनी केली. त्यावर चाकणकर यांनी सांगितले, मनिषा कायंदे यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती देखील मागवली होती. याबाबत मला खंत देखील वाटत आहे. यापूर्वीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी व त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रज्वला योजनेचा गैरफायदा घेतल्याचे आढळून आले आहे. ही माहिती लक्षवेधी मधून दिली जाईल असेही त्या म्हणाल्या. आम्हाला जी माहिती मागितली ती आम्ही दिली आहे. प्रज्वला योजनेचा पैसा पक्षाच्या प्रचारासाठी वापरला गेला, अशी तक्रार मनिषा कायंदे यांनी केली होती. याचा तपास झाला आहे, तो विधानसभेत लक्षवेधीमध्ये मांडला आहे.
प्रत्येक तालुक्याचा, जिल्ह्याचा आढावा वेगळा आहे. जळगाव आणि धुळेमध्ये एकही मनोधैर्य योजनेचा प्रकल्प प्रलंबीत नाहीत. काही ठिकाणी विधीसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. तर काही वेळेस कागदपत्रांमध्ये अडचणी असल्याने, तक्रार मागे घेतल्याने त्या तक्रारी कोर्टात जात नाहीत. वडगावशेरीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्यानंतर ती अतिदक्षता विभागात उपचार घेत होती. तीची प्रकृती चांगली असून, तिला जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. धर्मादाय आयुक्तालयामार्फत मुलीला वैदकीय खर्च देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.