पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan Toshakhana Case) यांच्या तोशाखाना प्रकरणातील अडचणी अधिकच वाढत असताना त्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी त्यांच्या ताफ्यासह दाखल झाले. यावेळी त्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. खान यांच्या समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक राऊंड फायर केले. दुसरीकडे, न्यायमूर्तींनी इम्रान खान यांना न्यायालयात हजेरी लावल्यानंतर न्यायालयाच्या आवाराबाहेर परतण्याची परवानगी दिली. तसेच न्यायालयात हजेरी लावल्यानंतर त्यांच्या वरील अटक वॉरंट सुद्धा न्यायालयाने रद्द केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अखेर आज तोशाखाना प्रकरणी सुनावणीसाठी कोर्टात हजर झाले. सुनावणीसाठी निघताच पोलिसांनी इम्रान यांचे लाहोरमधील घर ताब्यात घेतले. इम्रान यांच्याविरोधात जारी केलेले अटक वॉरंट इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द करून आज (दि.१८) त्यांना सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. (Imran Khan Toshakhana Case)
शाहबाज शरीफ सरकारने इम्रान खान यांच्याविरोधात फास आवळला असून एका प्रकरणात पोलीस गेल्या तीन दिवसांपासून इम्रान खान यांच्या अटकेसाठी प्रयत्न करत होते. शुक्रवारी इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ, दगडफेक करून पोलिसांना पळवून लावले. शुक्रवारी इम्रान यांना न्यायालयात हजर राहावे लागणार होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार इम्रान यांच्या घराजवळ हजारो कार्यकर्ते जमले. त्यांच्या सोबतीने इम्रान न्यायालयात गेले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने इम्रान यांच्यावरील अटक वॉरंट रद्द केले व त्यांना शनिवारच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. (Imran Khan Toshakhana Case)
इम्रान खान कार्यकर्त्यांनी इस्लामाबाद न्यायालयाच्या बाहेर गर्दी केली होती. यावेळी न्यायालयाच्या आवारात इम्रान खान समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला. दरम्यान आपल्याला अटक झाल्यानंतर पक्षाचे कामकाज पाहण्यासाठी इम्रान खान यांनी एका समितीची स्थापना केली आहे. याची माहिती त्यांनी इस्लामाबाद न्यायालयात शरणागती पत्करण्यापूर्वी रॉयचर्सला दिली होती. माझ्या जीवाला धोका आहे, असा दावा देखील त्यांनी केला होता. मी न्यायालयात हजर राहू नये म्हणून प्रयत्न करण्यात आले असा आरोप देखील इम्रान खान यांनी केला.
तोशाखाना खटल्याच्या सुनावणीच्या संदर्भात इम्रान खान इस्लामाबाद येथील न्यायालयात हजर होण्यासाठी निघताच पोलिस त्यांच्या लाहोर येथील जमान पार्कमधील निवासस्थानी पोहोचले. तेथील पंजाब पोलिसांनी घराचे गेट बुलडोझरने तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी पोलिसांवर गोळीबार झाला. पोलिसांनी पक्षाच्या २० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली, अशी माहिती पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दिली आहे.
इम्रान खान तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीच्या संदर्भात इस्लामाबादला जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. न्यायालयात जाण्याआधी इम्रान यांनी एक ट्वीट केले, "आता हे स्पष्ट झाले आहे की, माझ्या सर्व प्रकरणांमध्ये मला जामीन मिळाला असूनही, पीडीएम सरकार मला अटक करण्याचा विचार करत आहे. त्यांचे चुकीचे हेतू माहित असूनही, मी इस्लामाबाद आणि न्यायालयाकडे जात आहे. कारण माझा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे," असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा :