पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी विश्वचषक (ICC World Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Team India vs Australia) सहा विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर भारतीय खेळाडू निराश झाले. अनेक खेळाडूंचे डोळे पाणावले होते. प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुमची स्थिती कथन केली. द्रविड म्हणाले की, खेळाडू इतके भावूक झाले होते की प्रशिक्षक म्हणून हे दृश्य पाहणे मला कठीण झाले होते. काही खेळाडूंनी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपली भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली. आर अश्विनने (R Ashwin) एक ट्विट केले, जे व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने (Team India) नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने (Australia) त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर टीम इंडिया 50 षटकांत 240 धावांवर ऑलआऊट झाली. प्रत्युत्तरार ऑस्ट्रेलियाने चार विकेट गमावून 43 षटकांत लक्ष्य गाठले आणि सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने (R Ashwin) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, 'काल रात्री खूप वाईट वाटले. या मोहिमेदरम्यान प्रत्येक खेळाडूच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. येथे रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी यांचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. आधुनिक क्रिकेटच्या दिग्गज ऑस्ट्रेलियासाठी मी टाळ्या वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. काल त्यांनी मैदानावर जे केले ते अविश्वसनीय होते. सहाव्या विश्वचषकाचे विजेतेपद जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.'
अश्विनच्या (R Ashwin) या ट्विटवर एका चाहत्याने प्रतिक्रिया देत, 'मैदानावर तुझी ब्रेनची गरज होती. तुझे नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये असायला हवे होते.' अशी भावना व्यक्त केली आहे. खरेतर अश्विन विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला साखळी सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने प्रभावी गोलंदाजी करून एक विकेट घेतली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आळा घालण्यात अश्विनला प्लेईंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार ऐवजी स्थान मिळेल असा अंदाज सर्वांनी केला होता. पण रोहितने सेमीफायनलमधील संघ काय ठेवला.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 765 धावा कुटणा-या विराट कोहलीला 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' पुरस्काराने गौरविण्यात आले. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीने सर्वाधिक विकेट घेतल्या. टीम इंडिया 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यापूर्वी अजिंक्य ठरली होती.