Virat Kohli Batting : विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीची 19 तास 56 मिनिटे फलंदाजी, सचिन-विल्यमसनला टाकले मागे | पुढारी

Virat Kohli Batting : विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीची 19 तास 56 मिनिटे फलंदाजी, सचिन-विल्यमसनला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Batting : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आले. त्याने स्पर्धेतील 11 सामन्यात 6 अर्धशतके आणि 3 शतके झळकावली. तो तीनदा नाबाद राहिला. यादरम्यान त्याने 19 तास 56 मिनिटे फलंदाजी केली. यासह तो विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक वेळ फलंदाजी करणारा फलंदाज ठरला.

विराट कोहलीने नोंदवला अनोखा विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघ आणि खेळाडूंची कामगिरी चांगली झाली यात शंका नाही. स्पर्धेत सर्वाधिक धावा करून प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेल्या विराट कोहलीने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला एकाचवेळी मागे टाकले.

विराटची सर्वाधिक वेळ फलंदाजी (Virat Kohli Batting)

2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने आपल्या खात्यात 765 धावा जमा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात देखील त्याने अर्धशतकी खेळी (54 धावा) केली. कोहलीने या मोसमात एकूण 9 वेळा 50+ धावा फटकावण्याची किमया साधली. यादरम्यान त्याने टीम इंडियासाठी एकूण 19 तास 56 मिनिटे फलंदाजी केली.

तेंडुलकर-विल्यमसन टाकले मागे (Virat Kohli Batting)

विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक वेल फलंदाजी करणाऱ्या इतर खेळाडूंच्या यादीत केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर गेला आहे. केनने (578 धावा) 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 18 तास 51 मिनिटे फलंदाजी केली होती. या यादीत तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने 2003 च्या विश्वचषकात खेळपट्टीवर 18 तास 50 मिनिटे घालवली होती.

विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक वेळ फलंदाजी करणारे 3 फलंदाज

विराट कोहली : 19 तास 56 मिनिटे (2023)
केन विल्यमसन : 18 तास 51 मिनिटे (2019)
सचिन तेंडुलकर : 18 तास 50 मिनिटे (2003)

Back to top button