Serena Williams | मी निवृत्ती घेतलेली नाही, कोर्टवर परत येणार : सेरेना विल्यम्स

Serena Williams
Serena Williams

पुढारी ऑनलाईन डेस्क : २३ ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स (Serena Williams) हिने टेनिसमधील निवृत्तीबद्दल मोठा खुलासा केला आहे. अद्याप टेनिसमधून निवृत्ती घेतलेली नसल्याचे सांगत सेरेनाने कोर्टवर परत येण्याचे संकेत दिले आहेत. सेरेनाने ९ ऑगस्ट रोजी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, "मी निवृत्त घेतलेली नाही," असे विल्यम्सने सॅन फ्रान्सिस्कोमधील एका परिषदेत सांगितले आहे.

सप्टेंबरमधील यूएस ओपन २०२२ (US Opens 2022) स्पर्धेत सेरेना विल्यम्सला (Serena Williams) पराभवाचा धक्का बसला होता. महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत सेरेना विल्यम्सचा ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलजानोविकने (Ajla Tomljanovic) पराभव केला होता. २७ वर्षांच्या कारकिर्दीत सेरेनाने २३ ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदे जिंकली आहेत.

"मी कोर्टवर परत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही माझ्या घरी येऊ शकता, माझ्याकडे कोर्ट आहे," असे तिने म्हटले आहे. ४० वर्षीय या टेनिस स्टारने सांगितले की तिला तिच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचे आहे. "मला सेवानिवृत्ती हा शब्द कधीच आवडला नाही. तो मला आधुनिक शब्दासारखा वाटत नाही. मी त्याकडे परिवर्तन म्हणून पहात आहे, परंतु मी तो शब्द कसा वापरतो याबद्दल मी संवेदनशील व्हायचे आहे, ज्याचा अर्थ काहीतरी विशिष्ट असून तो लोकांसाठी महत्वाचा आहे," असे सेरेनाने व्होग मासिकाच्या लेखात म्हटले आहे.

यूएस ओपन एरामधील सर्वात प्रबळ महिला टेनिसपटू असलेल्या सेरेनाने यूएस ओपनमध्ये भावनिक होत प्रेक्षकांना निरोप दिला होता. "येथे असलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानते, जे मला अनेक वर्षे, दशके पाठिंबा देत आहेत." असे डोळ्यात अश्रू आणत विल्यम्सने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. हे सर्व माझ्या आई-वडिलांपासून सुरू झाले. मी त्यांची ऋणी आहे. हे आनंदाअश्रू आहेत, असे मला वाटते. आणि जर व्हिनस नसती तर सेरेना झाली नसती. धन्यवाद व्हिनस. सेरेना विल्यम्सचे अस्तित्व असण्याचे एकमेव कारण ती आहे. असे सेरेना म्हणाली होती.

२३ ग्रँडस्लॅम जेतेपदे

सेरेना विल्यम्सने २०१७ मध्ये शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकले होते. सेरेनाने आतापर्यंत २३ एकेरी ग्रँडस्लॅम जिंकली असून मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ती एक ग्रँडस्लॅम दूर आहे. २०१७ मध्ये मुलगी ऑलिम्पियाला जन्म दिल्यानंतर चार वेळा फायनलमध्ये पोहोचूनही तिला अंतिम सामना जिेकता आला नव्हता. त्यामुळे तिला मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करता आली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news