वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : महान टेनिसपटू सेरेना विल्यम्सला यूएस ओपनच्या तिसर्या फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवासह सेरेनाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. सेरेनाच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असल्याचे मानले जात आहे. मात्र त्यांनी निवृत्तीबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. या सामन्यात सेरेनाचा अजला तोमलजनोविकने 7-5, 6-7, 6-1 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने दुसर्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले, मात्र तिसर्या सेटमध्ये अजलाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत हा सेट सहज जिंकत सामना जिंकला.
तिसर्या फेरीतील पराभवानंतर सेरेनाने चाहत्यांना ज्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, त्यानुसार तिची निवृत्ती निश्चित मानली जात आहे. सेरेना म्हणाली, अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या तुम्हा सर्वांचे मी येथे आभार मानू इच्छिते. हे सर्व माझ्या पालकांपासून सुरू झाले. मी त्यांचा आभारी आहे.
सेरेनाने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. तिने टेनिसपासून अंतर राखत असल्याचे सांगितले होते. अशा स्थितीत यूएस ओपननंतर ती टेनिसमधून निवृत्ती घेईल, असे मानले जात आहे. जवळपास दीड वर्ष टेनिस कोर्टवर पूर्ण फ्लॉप राहिल्यानंतर सेरेनाने हे सांगितले होते. माजी नंबर-1 खेळाडू सेरेनाला गेल्या 450 दिवसांत केवळ एकच सामना जिंकता आला आहे.