पुढारी डेस्क : यूएस ओपन 2022 (US Opens 2022) स्पर्धेत सेरेना विल्यम्सला (Serena Williams) पराभवाचा धक्का बसला. महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत सेरेना विल्यम्सचा ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलजानोविकने (Ajla Tomljanovic) ७-५, ६-७(४), ६-१ असा तीन सेटमध्ये पराभव केला. यामुळे सेरेनाचे यूएस ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. ४० वर्षीय विल्यम्सने यूस ओपननंतर निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील ३ तास ५ मिनिटे चाललेल्या चुरशीच्या लढतीत टॉमलजानोविकने तिचा पराभव केला. २७ वर्षांच्या कारकिर्दीत सेरेनाने २३ ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदे जिंकली आहेत.
यूएस ओपन एरामधील सर्वात प्रबळ महिला टेनिसपटू असलेल्या सेरेनाने शुक्रवारी रात्री यूएस ओपनमध्ये भावनिक होत प्रेक्षकांना निरोप दिला. "येथे असलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानते, जे मला अनेक वर्षे, दशके पाठिंबा देत आहेत." असे डोळ्यात अश्रू आणत विल्यम्सने आपल्या भावना व्यक्त केल्या. हे सर्व माझ्या आई-वडिलांपासून सुरू झाले. मी त्यांची ऋणी आहे. हे आनंदाअश्रू आहेत, असे मला वाटते. आणि जर व्हिनस नसती तर सेरेना झाली नसती. धन्यवाद व्हिनस. सेरेना विल्यम्सचे अस्तित्व असण्याचे एकमेव कारण ती आहे. असे सेरेना म्हणाली.
"ही एक आनंददायी प्रवास आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात अविश्वसनीय प्रवास आहे." असेही तिने पुढे म्हटले. तर टॉमलजानोविकने म्हटले की "मला कधीच वाटले नव्हते की तिच्या अखेरच्या सामन्यात मला खेळण्याची संधी मिळेल. स्पर्धेच्या सगळ्या फायनलमध्ये मी तिला लहानपणी पाहिल्याचे आठवते. माझ्यासाठी हा एक खरा क्षण आहे."
सेरेना विल्यम्सने २०१७ मध्ये शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकले होते. सेरेनाने आतापर्यंत २३ एकेरी ग्रँडस्लॅम जिंकली असून मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ती एक ग्रँडस्लॅम दूर आहे. २०१७ मध्ये मुलगी ऑलिम्पियाला जन्म दिल्यानंतर चार वेळा फायनलमध्ये पोहोचूनही तिला अंतिम सामना जिेकता आला नव्हता. त्यामुळे तिला मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करता आली नाही.