ठाणे, पुढारी वृत्तसेवा : मला कोव्हीड झाल्यानंतर मी घरात कोसळून पडलो. सुरुवातीला मला ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी कोमात होतो. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः शरद पवार यांना फोन करून मला फोर्टीजला हलवण्यास सांगितले. १२ दिवस फोर्टीजला होतो, गेल्यात जमा होतो, त्यामुळे मी आज जो जिवंत आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच जिवंत असून म्हणूनच उद्धव ठाकरे हे कुटुंब वत्सल मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बहुतांश लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले. यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली. मात्र आव्हाड यांच्या प्रकृतीबाबत आतील माहिती कोणालाच देण्यात येत नव्हती. ठाण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मात्र त्यांनी या आठवणी सांगितल्या आहेत. कोरोना झाल्यानंतर मला ज्युपिटरला दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अतिशय खालावल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वतः शरद पवार यांना फोन करून मला फोर्टीजमध्ये दाखल करण्यास सांगितले.
१२ दिवस फ्रोटिजला होतो, गेल्यात जमा होती. शरद पवार आणि मुख्यमंत्री तसेच माझ्या पत्नीने हेल्थ बुलेटिन बाहेर येऊ दिले नाही. माझी प्रकृती अतिशय खालावल्याने माझे शत्रू आणि हितचिंतक खुश झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सातत्याने दोन महिने फोन मला करत होते. म्हणूनच मुख्यमंत्री कुटुंबवत्सल कसे आहेत त्याचे हे उदाहरण आहे. इतकं प्रेम आपल्या सहकार्याला देणे हे शिवरायांचे संस्कार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. आव्हाडांना एकदा कोरोना झाला मला दोनदा कोरोना झाला. अनेक नातेवाईक परके झाले, हा आजारचं तसा होता. त्यावेळी सर्वानी काम केले. आव्हाड जेव्हा कोमात होते तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना सांगितले कि तुम्ही पवार साहेबाना फोन करा, तुम्ही रिस्क घेऊन नका, फ्रोटिज मध्ये हलवा, मी डॉ. राहुल पंडित यांच्याशी नेहमी संपर्कात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.