दिल्लीत केजरीवाल यांच्या हस्ते १२ हजार स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन | पुढारी

दिल्लीत केजरीवाल यांच्या हस्ते १२ हजार स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीच्या सरकारी शाळांमधील नवीन १२ हजार ‘स्मार्ट क्लासरूम’ चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. राज्यातील २४० सरकारी शाळांमधील स्मार्ट क्लासरूमची संख्या आता १२ हजार ४३० पर्यंत पोहचली आहे. दिल्लीत खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती होत आहे. राज्यात चांगल्या शाळा आणि वर्ग बनवले जात आहे. देशातील खासगी शाळांदेखील एवढे स्मार्ट नसतील जेवढ्या दिल्लीतील सरकारी शाळा आहेत. यावर्षी ३ लाख ७० हजार मुलांनी खासगी शाळांमधून नाव कमी करीत दिल्लीच्या सरकारी शाळेत प्रवेश केले आहेत. राज्यातील शैक्षणिक क्रांतीचे हे द्योतक असल्याची भावना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

 खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांचा निकाल चांगला येईल, याचा कोणी विचार देखील केला नव्हता. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने ११ हजार वर्गखोल्या उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. आता १२ हजार ४३० वर्गखोला बांधून तयार आहेत. शाळांमध्ये बहुद्देशीय सभागृह, अत्याधुनिक प्रयोगशाळांसह अनेक वर्गखोल्या डिजिटल बनवण्यात आल्या आहेत. बड्या खासगी शाळांमध्ये देखील अशी व्यवस्था नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही. पंरतु, दिल्ली सरकार डॉ. बाबासाहेब आणि भगत सिंह यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत आहे. राज्यातील शाळांमध्ये सर्व मुले एकत्रित शिक्षण घेत आहेत. न्यायाधीशाचा मुलगा असो, अधिकार्‍याचा अथवा मजुराचा मुलगा. सर्व एकाच वर्गात शिक्षण घेत आहेत. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात शाळा आणि रूग्णालये उभारण्याचे आश्वासने देतात. पंरतु, दिल्ली सरकारने निवडणुकीच्या पूर्वीच वर्गखोल्याचे बांधकाम पूर्ण करून दाखवले आहे. इतर राज्यांना दिल्ली सरकारप्रमाणे सरकारी शाळांमध्ये शिक्षण व्यवस्था हवी असल्यास मदत करायला तयार असल्याचे केजरीवाल म्हणाले. यावेळी केजरीवाल यांनी ‘इंकलाब जिंदाबाद, शिक्षा क्रांती जिंदाबाद’ अशी घोषणा दिल्या आहेत.

हेही वाचलतं का?

Back to top button