पुढारी ऑनलाईन डेस्क: हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १० जण जखमी झालेत. तर ३०३ जनावरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती हिमाचलप्रदेश आपत्ती व्यवस्थापनचे (Himachal Pradesh) प्रधान सचिव ओंकार चंद शर्मा यांनी दिली आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
पुढे आपत्ती व्यवस्थापनचे प्रधान सचिव ओंकार चंद शर्मा म्हणाले, मुसळधार पावसाने राज्यातील ६ मोठया पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने अनेक पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. आम्ही येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना राज्य सरकार आणि आपत्ती व्यवस्थापनाद्वारे जारी केलेल्या सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती (Himachal Pradesh) करत असल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे मंडी जिल्ह्यातील सेराज खोऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सेरज येथील तुंगाधर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक वाहने वाहून गेली. कुल्लू जिल्हा मुख्यालयाजवळील दोहरनाला भागात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल खड्डामध्ये पूर आला होता.