Monsoon Update : गुडन्यूज! मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; IMD ची माहिती | पुढारी

Monsoon Update : गुडन्यूज! मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; IMD ची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : नैऋत्य मान्सून अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दाखल झाला आहे, ही गुडन्यूज भारतीय हवामान विभाग, पुणे चे विभागप्रमुख डॉ. के. होसाळीकर यांनी ट्विटरच्‍या माध्‍यमातून दिली. दरवर्षी सरासरी १५ जूनपर्यंत पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतो, यंदा मात्र तब्बल दहा दिवसांनी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला (Monsoon Update Live) आहे.

दरवर्षी १ जून दरम्यान मान्सून भारतात म्हणजेच केरळात दाखल होतो. यंदा मात्र ८ जूनला मान्सून केरळात पोहचला. यानंतर ११ जून रोजी तो महाराष्ट्रातील तळकोकणात होता. बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कित्येक दिवस तो तिथेच रखडला होता. चक्रीवादळाची स्थिती थंडावल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आणि आज अखेर या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मान्सूनने अखेर महाराष्ट्र व्‍यापल्‍याने शेतकर्‍याला दिलासा मिळाला आहे. (Monsoon Update Live)

Monsoon Update : यंदा मान्सून सर्वप्रथम विदर्भामार्गे महाराष्ट्रात

यंदाच्या नैऋत्य मान्सूनमध्ये असामान्य बदल दिसून आला. प्रत्येकवर्षी सर्वसामान्य नैऋत्य मान्सून अरबी समुद्रातून भारतातील केरळात सर्वप्रथम दाखल होतो. त्यानंतर मुंबईतून संपूर्ण राज्यात पोहचतो. यंदा मात्र बंगालच्या उपसागरातून दुसऱ्या शाखेमार्फत मान्सून पूर्वेकडील राज्यांमधून भारतात दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रात देखील विदर्भामार्गे सर्वप्रथम मान्सून दाखल झाला. त्यामुळेच मुंबईसह दिल्लीत आज एकाचवेळी मान्सून सक्रिय झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.

दोन दिवसात मान्सून देश व्यापणार- डॉ. मृत्युंजय मोहापात्रा

नैऋत्य मान्सून देशातील बहुतांश भागात सक्रीय झाला आहे. देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मूच्या काही भागातही मान्सून दाखल झाला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र देखील मान्सूनने व्यापला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल आणि देशातील इतर भाग देखील व्यापेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button