पुढारी ऑनलाईन डेस्क: बिहारनंतर झारखंडमध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून काल (दि.१ फेब्रुवारी) संध्याकाळी अटक करण्यात आली. यानुसार अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोरेन यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. परंतु न्यायालयाने सोरेन यांच्या कोठडीचा निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी उद्या होणार आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
ईडीने हेमंत सोरेने यांना काल अटक केल्यानंतर आज (दि.१) रांचीमधील पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले. दरम्यान ईडीने सोरेन यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. परंतु रांची न्यायालयाने आदेश राखून ठेवल्याने सोरेन यांना आणखी एक रात्र न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Hemant Soren Judicial Custody)
झारखंडमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी झारखंड विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांना आज (दि.१) सायंकाळी ५.३० वाजता राजभवनात बोलावले आहे. बुधवारी हेमंत सोरेन यांना अटक होण्यापूर्वी चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर चंपायी यांनी गुरुवारी (दि.१) राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. चंपाई सोरेन यांना राज्यपालांनी ५.३० वाजताची वेळ दिल्याने लवकरच झारखंडमध्ये नवीन मुख्यमंत्र्याची निवड होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. (Hemant Soren Judicial Custody)
ईडीच्या अटक कारवाईविरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर शुक्रवार,२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी दिली. ( Hemant Soren Judicial Custody)
दोन दिवसांपूर्वी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर काही तास चौकशी केल्यानंतर ते सोरेन नॉचरिचेबल होते. तब्बल ३० तास नॉट रिचेबल असलेले सोरेन रांची येथील निवास्थानी पोहचले आणि त्यांनी पक्षातील आमदारांची बैठक घेतली. पुन्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल संध्याकाळी ईडीने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ईडी कोठडी सुनावली.
ईडी हेमंत सोरेन यांची चौकशी रांचीमधील बडगई भागातील लष्कराच्या मालकीच्या ४.५५ एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. या प्रकरणी महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने सोरेन यांना 14 ऑगस्ट 2023 रोजी पहिले समन्स जारी केले होते. यानंतर सोरेन यांना सात समन्स बजावले होते पण ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. अखेर 20 जानेवारीला आठव्या समन्सनंतर त्यांनी आपले म्हणणे नोंदवले. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे. यामध्ये २०११ बॅचचे आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.
या प्रकरणी 13 एप्रिल रोजी ईडीने झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमधील सुमारे 22 ठिकाणांवर छापे टाकले होते, ज्यात झारखंड कॅडर आयएएस छवी रंजन यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. रंजन हे यापूर्वी रांचीचे उपायुक्तही राहिले आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार ईडीने ही कारवाई केली होती.
ईडीने अटक करण्यापूर्वी हेमंत साेरेन यांनी एक व्हिडिओ जारी केला. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माझा संबंधित नसलेल्या प्रकरणी मला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट तक्रारीच्या आधारे मला अटक केली जात आहे. आज नाही तर उद्या सत्याचा विजय होईल. अलीकडेच बिहार राजकीय षडयंत्राचा बळी ठरला आहे, आता त्यांना झारखंडचा दुसरा बळी बनवायचा आहे, असा आरोपही त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केला होता.