नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील थंडीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढू लागला असून, राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी तापमान शून्य अंशाखाली गेले आहे. राज्यातील सिकर जिल्ह्यातील फतेहपूर येथे गेल्या २४ तासात तापमान उणे 3.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले तर चुरू येथे उणे 1.1 अंश तापमानाची नोंद झाली आहे. (Heavy Cold wave)
उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी थंडीच्या मोसमातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान नोंदविले गेले आहे. येत्या काही दिवसात थंडीचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राजस्थानमध्ये जयपूर येथे सरासरीच्या तुलनेत चार अंश से. कमी म्हणजे 4.9 अंश इतकी किमान तापमानाची नोंद झाली.
मध्य प्रदेशात राजधानी भोपाळसह इतरत्र पारा खाली आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी लोकांना शीतलहरींचा सामना करावा लागत आहे. राज्यात ग्वाल्हेर, दतीया आणि नौगाव येथे सर्वात कमी चार अंश से. तापमानाची नोंद झाली.
काश्मीरच्या पर्वतरांगात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात शीतलहर आली आहे. काश्मीर खोऱ्यासह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरु आहे.गेल्या चोवीस तासात श्रीनगर येथे उणे सहा तर जम्मू येथे 2.3 अंश से. तापमानाची नोंद झाली. काश्मीर खोऱ्यातील पहलगांम येथे उणे 8.3 तर गुलमर्ग येथे उणे 8.5 अंश से. तापमान नोंदविले गेले आहे.
हेही वाचलं का?